मुंबई : मॉडेलवर बलात्कार प्रकरणी वादग्रस्त ठरलेले अपर पोलीस आयुक्त सुनील पारसकर यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. गृह विभागाच्या वरिष्ठ पुनर्विलोकन समितीने हा निर्णय घेतला आहे. एका मॉडेलने पारसकर यांनी आपल्याला फूस लावून मढ येथील बंगल्यावर नेऊन बलात्कार केला. तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल जून २०१४मध्ये मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पारसकर यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी १४ डिसेंबरला त्यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली. त्यानुसार अपर मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. (प्रतिनिधी)सलग सेवा धरली जाणारसुनील पारसकर हे १९८४चे उपअधीक्षक असून, त्यांना १९९७मध्ये आयपीएस केडर मिळाले आहे. निलंबन रद्द झाल्याने त्यांची सेवा सलग धरली जाईल; आणि सेवा ज्येष्ठतेनुसार ते विशेष महानिरीक्षक-सहआयुक्तच्या बढतीसाठी पात्र ठरले आहेत. निवृत्तीला काही महिन्यांचा अवधी असल्याने त्यांना बढती दिली जाते की अपर आयुक्त पदावरच नियुक्ती केली जाते, याबाबत पोलीस वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
पारसकरांचे निलंबन रद्द
By admin | Published: January 13, 2016 1:58 AM