कल्याण : कोळसेवाडीचे उपनिरीक्षक नितीन डगळे यांना जरीमरी मित्र मंडळाचे कार्यकर्ते बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली अन्यथा विसर्जनाच्यावेळी बेशिस्त वर्तन केल्याबद्दल डगळे यांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरु होत्या, अशी सनसनाटी माहिती पोलीस दलातील सूत्रांनीच उघड केली आहे.जरीमरी तलावापाशी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरु असताना कर्कश्य आवाजात वाद्य वाजवण्यावरून डगळे आणि जरीमरी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये साडेनऊ वाजता वाद झाला. यावेळी राहुल गायकवाड याने डगळे यांना पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला, असे डगळे यांचे म्हणणे आहे तर डगळे यांनीच राहुलला पाण्यात ओढले व त्यामुळे उभयतांमध्ये पाण्यात झटापट झाली, असा जरीमरी मित्र मंडळाचा दावा आहे.हा प्रकार घडला तेव्हा बंदोबस्ताला असलेल्या एका महिला हवालदाराने त्याचा व्हिडीओ काढला. तिनेच कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन झाला प्रकार वरिष्ठांना कथन केला. संबंधित पोलीस उपायुक्त व सहाय्यक उपायुक्त यांनी जरीमरी तलावाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली. या राड्याची वार्ता कानावर गेल्याने स्थानिक आमदार गणपत गायकवाड हे जरीमरी मित्र मंडळाच्या काही मंडळींना घेऊन पोलीस ठाण्यात गेले. तेथे तब्बल दीड तास गायकवाड व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक झाल्याचे समजते. यावेळी डगळे यांनी जरीमरी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचे ढोल फोडले, त्यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला आणि एका कार्यकर्त्याला पाण्यात ओढून त्याच्याशी झटापट केली हे वर्तन बेशिस्त असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही बाब पोलिसांच्या गळी उतरवण्यात गायकवाड यशस्वी झाले होते, असे कळते. त्यानंतर गायकवाड तेथून बाहेर पडल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तासभर बैठक झाली. डगळे यांच्यावर कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच महिला हवालदाराने व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि पोलिसाला तलावात बुडवून ठार मारण्याच्या या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली. परिणामी आमदार व गणपती मंडळ विरुद्ध पोलीस अशा संघर्षात पोलिसांनी कुरघोडी केली. यापूर्वी विधानभवनात पोलिसाला आमदारांनी मारहाण केल्यानंतर आमदारांच्या अटकेकरिता पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी फिल्डींग लावली होती. कल्याणच्या घटनेचा दुसऱ्या कोपऱ्यातून काढलेला व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात जरीमरी मित्र मंडळाने केलेल्या दाव्यानुसार डगळे हे लाठीमार करताना, स्वत: गणेशमूर्तीचे विसर्जन करताना आणि राहुल गायकवाड या कार्यकर्त्यांला खेचून पाण्यात उडी मारताना दिसत आहेत. १) जरीमरीच्या कार्यकर्त्यांसोबत डगळे यांचा वाद सुरु असताना महिला पोलीस व्हिडीओ का काढत होत्या?२) आमदार गणपत गायकवाड हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात डगळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी गेले होते का?३) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत डगळे यांच्यावर कारवाई करण्याचे निश्चित झाले ही बाब बाहेर कशी फुटली?४) डगळे यांचा व्हिडीओ वरिष्ठांच्या संमतीने व्हायरल झाला की, डगळे यांच्या हितचिंतक महिला हवालदाराने स्वत:हून व्हायरल केला?