जितेंद्र कालेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: विनयभंग प्रकरणाची तक्रार घेऊन कापूरबावडी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेची महिला पोलीस हवालदार पी.पी. संख्ये यांनी चौकशी केली. त्यानंतर ठाणे अंमलदाराने त्यांची तक्रार नोंदवून घेतली. मात्र, या तक्रारीवर संख्ये यांची स्वाक्षरी घेण्याची औपचारिकता पूर्ण न केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक एस.पी. पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तांत्रिक बाबीमुळे झालेल्या कारवाईबद्दल पोलीस वर्तुळात नाराजीचा सूर उमटत आहे.मानपाड्यातील एक महिला आपल्या पती आणि शेजारील महिलेसोबत १५ मे रोजी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार करण्याकरिता आली होती. एका आंबटशौकिनाने तिच्या नकळत ती अंघोळ करतानाचे चित्रीकरण त्याच्या मोबाइलमध्ये केले होते. ही बाब लक्षात येताच तिने त्याचा मोबाइल हिसकावून पतीसह पोलीस ठाणे गाठले होते.तिच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत उपनिरीक्षक पवार यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला रात्री ९.३० वा. अटकही केली. महिला हवालदार संख्ये यांच्या चौकशीनंतरच या प्रकरणाची तक्रार दाखल झाली होती. संख्ये यांना त्यादिवशी पोलीस ठाण्याच्या सीसीटीएनएस (क्राइम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) मध्ये गुन्हे नोंदवण्याची ड्युटी होती. त्यामुळे संख्ये यांच्या उपस्थितीत ही तक्रार नोंदली गेली, अशी नोंद करून त्यावर त्यांची स्वाक्षरी घेण्याची औपचारिकता पूर्ण करणे राहून गेले. तक्रारदार महिलेने आपले ते चित्रीकरण पुरुष पोलिसांनी वारंवार पाहिल्याने आपला पुन:पुन्हा विनयभंग झाल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळा रंग प्राप्त झाला. प्रसारमाध्यमांत चर्चा रंगली. थेट गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दखल घेतली व संबंधितांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना दिले. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी अगोदर केली होती. मात्र, मीडिया व राजकीय दबाव वाढल्याने मुख्यालयाच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही चौकशी केली. आरोपी अटकेनंतरही कारवाईमुळे नाराजीमहिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लागलीच आरोपीला अटक केली. चौदावे रत्न दाखवल्याने त्याने आपली चूक कबूल केली. त्याच्यावर कायदेशीर कारवाईदेखील झाली. मात्र, एका तांत्रिक चुकीकरिता उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची भीती काही पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
निलंबनाबद्दल पोलिसांत चीडचीड
By admin | Published: June 05, 2017 3:23 AM