लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सभागृहात चर्चा होऊन काही ठरत नाही तोपर्यंत राज्यातील कृषी, घरगुती वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत सरकारला घेरले आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चेची मागणी लावून धरली. त्यावर पवार यांनी स्थगितीची घोषणा केली. भाजपच्या विधिमंडळ सदस्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आ. राम सातपुते यांच्या नेतृत्वात विधान भवनच्या पायऱ्यांवर कामकाज सुरू होण्यापूर्वी वीज कनेक्शनप्रश्नी जोरदार घोषणा देत फलक फडकविले. अवास्तव वीज बिले रद्द करा, अशी मागणीही त्यांनी केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच फडणवीस यांनी हल्लाबोल केला. काँग्रेसचे आ. नाना पटोले यांनीही वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती देण्याची मागणी उचलून धरली. त्यावर सभागृहात सदर विषयावर चर्चा होऊन काही ठरत नाही तोपर्यंत कनेक्शन कापण्यास स्थगिती देत असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. कृषिपंपांना दिवसा वीज - मुख्यमंत्रीकृषिपंपांना दिवसा वीज देण्याला आपल्या सरकारचे प्राधान्य असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ऊर्जा विभागाच्या महा कृषी ऊर्जा अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ३० हजार कृषीपंपांना दिवसा वीज दिली जात असल्याचे सांगितले.
अशी आहे थकबाकी
उच्चदाब ग्राहक ९४६ कोटी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक लघुदाब ग्राहक ५,०८९ कोटी कृषी पंप ७९५ कोटी सार्वजनिक पाणीपुरवठा ७३ कोटी पथदिवे ७९५ कोटी
७१५४कोटी एकूण थकबाकी वीज ग्राहकांकडे असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
१०,००० कनेक्शन सरासरी प्रत्येक जिल्ह्यात कापण्यात आले आहेत.