मुंबई : ‘शॉप डोअर डिलिव्हरी’ची मागणी मान्य झाल्याने रेशन दुकानदारांनी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाहतूक खर्चात वाढ किंवा दुकानापर्यंत धान्य पोहोच करण्याची मागणी मुंबई रेशन दुकानदार संघटनेने केली होती, अन्यथा शासकीय गोदामातून रेशनचे धान्य उचलणार नसल्याचा इशारा दिला होता.शुक्रवारी वाहतूक कंपन्यांच्या कंत्राटदारांची बैठक रेशनिंग नियंत्रकांच्या कार्यालयात पार पडणार असल्याचे, मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू यांनी सांगितले. या वेळेस मारू म्हणाले की, ‘कंत्राट काढण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे. मात्र, कंत्राट योग्य व्यक्तीला मिळतेय का? आणि दुकानदारांच्या दुकानापर्यंत माल पोहोच होतोय का? यावर संघटनेची करडी नजर असेल. रेशन दुकानदारांनी पुढील महिन्यातील माल उचलण्याचे आवाहन मारू यांनी केले आहे. मात्र, शॉप डोअर डिलिव्हरी सुरू झाल्यानंतर प्रत्येक दुकानदाराने वाहतुकीचा खर्च करणे बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय पोहोच होणारा माल तपासून काही गडबड वाटल्यास तत्काळ संघटनेसोबत संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रेशनिंग दुकानदारांची आंदोलनाला स्थगिती
By admin | Published: January 22, 2016 3:18 AM