मुंबई : औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये २०१२मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग ३ पदांवर नियमबाह्य व चुकीच्या नियुक्त्या प्रकरणी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. मात्र त्याच्या काही तास आधीच डॉ. माने यांचे काम अत्यंत समाधानकारक असल्याचा शेरा देत त्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपवून त्यांची नियुक्ती पुढे चालू ठेवण्याचा निर्णय विभागाने घेतला होता, ही बाबही समोर आली आहे. या नियुक्त्यांमधील घोटाळ्यांसंदर्भात औचित्याचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित झाला. सुभाष साबणे, अतुल सावे, प्रशांत बंब, जयप्रकाश मुंदडा या आमदारांनी माने यांना निलंबित करून सदर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ज्या मानेंचे आज निलंबन करण्यात आले त्यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कालच एक जीआर काढून शाबासकी दिली होती. माने हे एमपीएससीमार्फत संचालक म्हणून आले होते. त्यांचा दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी काल संपला. या कालावधीतील त्यांची कामगिरी समाधानकारक असल्याचे प्रमाणपत्र देत त्यांची नियुक्ती पुढे चालू ठेवण्यात येत असल्याचे या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या विद्यापीठामध्ये २०१२ मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग ३ मधील ५३ पदांवर चुकीच्या पध्दतीने नियम डावलून भरती करण्यात आल्याच्या तक्रारी विविध संघटनांनी केल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने उच्च शिक्षण संचान्यालनालयाने २०१४ मध्ये चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली होती. या समितीने आपला सविस्तर अहवाल शासनास या पूर्वीच सादर करुन या प्रक्रियेतील अधिकाऱ्यांविरुध्द नियमबाहय नियुक्त्यांचा ठपका ठेवला होता. त्यावेळी माने हे कुलसचिव होते. या नियुक्त्यांसंबंधित प्राधिकरणाच्या अनुमतीशिवाय बेकायदेशीर व मनमानी पध्दतीने केल्याचे अहवालात नमूद केले होते. तरीही संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात मंत्रालयातील वरिष्ठ दजार्चे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा मुद्दा सुभाष साबणे, अतुल सावे, प्रशांत बंब, जयप्रकाश मुंदडा आदी सदस्यांनी उपस्थित केला आणि दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची आग्रही मागणी त्यांनी तावडे यांच्याकडे केली. सदस्यांच्या या तीव्र भावना लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी डॉ. धनराज माने यांना निलंबित करण्याची घोषणा केली. (विशेष प्रतिनिधी) >2012मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग ३ मधील ५३ पदांवर चुकीच्या पद्धतीने नियम डावलून भरती करण्यात आल्याच्या तक्रारी विविध संघटनांनी केल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नियुक्त्यांमधील घोटाळ्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई कोणी अडविली, कोणी घोटाळेबाजांना संरक्षण दिले याची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत केली जाईल. या चौकशीत कितीही ज्येष्ठ निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीचे आदेशअधिकारी दोषी आढळला तरी त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे तावडे म्हणाले.
भरतीतील घोटाळ्यामुळे राज्याचे उच्च शिक्षण संचालक निलंबित
By admin | Published: April 07, 2017 6:26 AM