शेगाव : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी खामगावचे तहसीलदार आकाश लिगाडे आणि दुय्यम निबंधक कणसे या दोघांना शनिवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव खडसे यांनी ही माहिती पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली. शेगाव विकास आराखड्याबाबत शेगाव येथील विश्राम भवनात शनिवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खामगावचे आमदार अँड.आकाश फुंडकर यांनी खामगावच्या विविध समस्या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासमक्ष मांडल्या. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई असताना तहसीलदार आकाश लिगाडे यांच्याकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाही, त्यांनी गावांना भेटीही दिल्या नाही. याशिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना विहित मुदतीत मदत दिली जात नसून, आणखी काही तक्रारी यापूर्वीही शासनाकडे आल्याने तहसीलदार आकाश लिगाडे यांना निलंबित करण्यात आले. रक्ताच्या नात्यातील मालमत्ताधारकांना स्टॅम्पवर हिस्से वाटणी करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र अशा प्रकरणातून ५000 रुपये मिळाले तरच हिस्सेवाटणी करायची, अन्यथा मालमत्ताधारकांना चकरा मारायला लावायच्या अशा तक्रारी खामगाव येथील दुय्यम निबंधक कणसे यांच्याविरूद्ध होत्या. या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने दुय्यम निबंधक कणसे यांनाही निलंबित करण्यात आले. दोन्ही अधिकार्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने निलंबित करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री खडसे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
खामगावच्या तहसीलदारासह दुय्यम निबंधक निलंबित
By admin | Published: March 13, 2016 2:08 AM