- राजेश भोजेकर,
वर्धा, दि. 3 - पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील आग व नंतर बॉम्बस्फोटाला ‘सिगार’ कारणीभूत असल्याचा संशय काही सूत्राकडून वर्तविला जात आहे. या स्फोटाची ‘कोर्ट आॅफ इक्वॉयरी’ सुरू असून देशभरातील तपास यंत्रणाही कामाला लागलेल्या आहेत. या यंत्रणेने या दिशेने तपास केल्यास या बाबीचा उगलडा होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.
पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात सोमवारी मध्यरात्री शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट होण्यापूर्वी आग लागली असे प्राथमिक कारण आतापर्यंत पुढे करण्यात आले आहे. मग ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधणेही तेवढेच गरजेचे आहे. आग रात्रीला ११ अचानक आग लागल्याचे माहिती झाले आणि लष्करी यंत्रणा कामाला लागली. वास्तविक, आगीचे हे रुप धारण करण्यापूर्वी ती काही तासांपूर्वीपासून धुमसत असावी, असाही संशय व्यक्त केल्या जात आहे. मग आगीची नेमकी सुरूवात कुठून आणि केव्हा झाली, ही बाबही तेवढीच महत्त्वाची ठरणारी आहे.
या दारूगोळा भांडारातील बहुतांश अधिकारी आणि जवानांना सिगारेट ओढण्याचा शोक असल्याची विश्वसनीय माहिती आहे. येथील सुरक्षा यंत्रणा नेहमी सजग असते. त्यामुळे आत प्रवेश करताना सर्व बाबींची तपासणी झाल्याची खात्री पटल्यानंतरच प्रवेश दिला जातो. असे असतानाही येथील अधिकारी वर्ग सिगारेट घेऊन बिनदिक्कतपणे भांडारात प्रवेश करीत असल्याची धक्कादायक माहिती सूत्राने दिली.
प्रवेशद्वारावर या अधिकाºयांना हटकणे म्हणजे साहेबांना ज्ञान सांगण्यासारखे आहे. वास्तविक, भांडारात अधिकाºयांना किती दारूगोळा गेला आणि किती आला, याचाच हिशेब ठेवावा लागतो. यापेक्षा दुसरे मोठे जबाबदारीचे काम नसल्यामुळे येथला अधिकारी वर्ग सिगारेट ओढत असल्याची माहितीही सूत्राने दिली. याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे बॉम्बस्फोटापूर्वी लागलेल्या आगीसाठी ‘चिंगारी’चे काम सिगारेटने केले असण्याची दाट शक्यताही सूत्रांकडून वर्तविली जात असली तरी तपासात काय निष्पन्न होते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
सुकलेले गवत आणि सिगार
दारूगोळा भांडाराला आग लागल्याची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. या आगीच्या घटना होऊ नये, याची खबरदारी म्हणून भांडाराच्या संरक्षण भिंतीच्या आतील सुकलेले गवत काढण्याचा कंत्राट दिला जातो, अशी माहिती आहे. यावर्षी हे गवत कापण्यात आले नसल्याची माहितीही सूत्राने दिली. सिंगारची चिंगारी आणि सुकलेले गवत या आगीला कारणीभूत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.