मुंबई : विरोधी पक्षाच्या १९ आमदरांचे निलंबन हे ते कर्जमाफीची मागणी करीत होते म्हणून केलेले नाही तर त्यांनी सभागृहात केलेले अशोभनीय वर्तन आणि अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्यामुळे केल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या निलंबनाचे जोरदार समर्थन केले. शिवसेनेच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याचे प्रयत्नही विरोधकांनी करून पाहिले पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली कर्जमाफीबाबत चर्चा झाल्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला. डॉ.जयप्रकाश मुंदडा, अनिल कदम, सुभाष साबणे, विजय औटी, आशिष देशमुख, भीमराव धोंडे आणि मंगलप्रभात लोढा या भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी गुरुवारी विधानसभेत पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी केली होती. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिले. ते म्हणाले की, राज्यातील प्रत्येक माणसाच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब असलेला अर्थसंकल्प हा एक संवैधानिक दस्तावेज आहे. त्याच्या प्रती विरोधकांनी जाळल्या. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्प सादर करीत असताना कर्जमाफीच्या मागणीसारखा गंभीर विषय विरोधकांनी चेष्टेचा आणि थट्टेचा केला. अशोभनीय वर्तन करीत चेष्टा केली. त्यामुळे त्यांना निलंबित करावे लागले. कर्जमाफीची मागणी तर भाजपा-शिवसेनेच्याही सदस्यांनी केलेली होती मात्र त्यांचे वर्तन तसे नव्हते. मात्र विरोधक या मुद्यावर उघडे पडले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचीच राज्य शानसाची भूमिका आहे आणि त्यासाठीच आम्ही केंद्राकडे मदतही मागितली आहे. ती आम्हाला मिळेल,असा विश्वास आहे. शेती व्यवसाय हा परवडणारा व्हावा यासाठी एकरी उत्पादकता वाढवावी लागेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर आपल्या सरकारने भर दिला असून त्यासाठी ३० हजार कोटी रुपये दिले जात आहेत. या शिवाय, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीतून शेतमालाला देशविदेशातील बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतीचे अर्थशास्र बदलल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
अशोभनीय वर्तनामुळे आमदारांचे निलंबन!
By admin | Published: March 25, 2017 12:39 AM