बुलडाणा : दिवसभरापासून बेपत्ता असलेल्या चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील चिमुकल्या बहिण, भावाचे मृतदेह रविवारी सायंकाळी शेतातील एका विहिरीमध्ये आढळल्याने खळबळ उडाली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, संग्रामपूर येथील दोन मुलांचे अपहरण झाल्याची आणखी एक घटना उजेडात आल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. अंत्री खेडेकर येथील निलेश प्रल्हाद खेडेकर हे रविवारी दुपारी त्यांच्या जावयासोबत शेतात गेले होते. त्यावेळी त्यांच्यामागे मुलगी मानसी (८) आणि मुलगा आयुष (४) हेदेखील शेतात गेले. खेडेकर यांनी मुलांना घरी जाण्यास सांगितले; मात्र संध्याकाळपर्यंंत दोघेही घरी परतलेच नाही. त्यामुळे आई वडीलांनी शोधाशोध सुरू केली. परिसरातील इतर गावांमध्येही शोध घेतला; मात्र त्यांचा थांगपत्ता न लागल्यामुळे मुलांच्या वडीलांनी सायंकाळी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, सायंकाळी उशिरा अंत्री खेडेकर शिवारातील शेतातील एका विहिरीत या भावंडाचे मृतदेह आढळून आले. दोन्ही चिमुकले खेळता-खेळता विहीरीत पडले की, यामागे काही घातपात आहे, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. दरम्यान, संग्रामपूर येथील जिल्हा परिषद हायस्कुलचे दहावीचे दोन विद्यार्थी शनिवारपासून बेपत्ता झाल्याची आणखी एक घटना रविवारी उजेडात आली. काशीराम शालीग्राम उमाळे यांनी तामगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा सुरज (१५) व त्याचा मित्र अजहर (१६) हे ८ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजता शाळेत जात होते. त्यावेळी एका अज्ञात इसमाने दोन्ही मुलांचे अपहरण केल्याचा आरोप उमाळे यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. चिखली येथील दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू आणि संग्रामपूर येथील दोन मुलांचे अपहरण, अशा दोन घटना एकाच दिवशी उजेडात आल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.
बहीण, भावाचा संशयास्पद मृत्यू; दोन विद्यार्थ्यांचे अपहरण
By admin | Published: August 10, 2015 12:36 AM