मुंबई : हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेल्या शिखा जोशी (४0) या अभिनेत्रीचा मृतदेह तिच्याच अंधेरी येथील घरात आढळला. वर्सोवा पोलिसांनी या घटनेची नोंद करीत तपास सुरू केला आहे. शिखा जोशी अंधेरीतील न्यू म्हाडा कॉलनी परिसरात एकटीच राहत होती. मूळची दिल्ली येथे राहणारी शिखा गेल्या १५ वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षांत अनेक हिंदी मालिकांमध्ये तिने काम केले आहे. मात्र वर्षभरापासून तिच्याकडे काहीच काम नसल्याने ती मानसिक तणावाखाली होती. शनिवारी रात्री तिच्या शेजारी राहणारी एक मैत्रीण तिच्या घरी गेली असता, शिखा घरातील बाथरूममध्ये जखमी अवस्थेत आढळली. मैत्रिणीने काही रहिवाशांच्या मदतीने तिला कोकिळाबेन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी करून पंचनामा केला. शिखाच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केल्याच्या जखमा आहेत. आज सकाळी कूपर रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. तिच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (प्रतिनिधी)
अंधेरीत टीव्ही अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: May 18, 2015 4:42 AM