मुंबई : ज्येष्ठ नाट्यनिर्माते व ‘सुयोग’ या नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे सुधीर भट यांच्या निधनानंतर, कथित वाद आणि चर्चेच्या फेऱ्यात अडकलेली ‘सुयोग’ ही संस्था अखेर सुधीर भट यांच्या परिवाराच्या ओंजळीत आली आहे. १९ फेब्रुवारी २०१६ पासून या संस्थेचा ताबा सुधीर भट यांच्या पत्नी कांचन भट यांच्याकडे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आले असल्याचे खुद्द कांचन भट यांनीच स्पष्ट केले आहे.सुधीर भट यांचे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाल्यानंतर ‘सुयोग’ या संस्थेत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गोपाळ अलगेरी यांनी ‘सुयोग’ची धुरा हाती घेतली. तेव्हापासून कांचन भट, तसेच त्यांचे पुत्र संदेश भट आणि गोपाळ अलगेरी यांच्यात या संस्थेच्या हक्कावरून वादाची ठिणगी पडली होती. परंतु आता सर्व वाद हे सामोपचाराने मिटल्याचे कांचन भट यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. या एकंदर प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या, सुधीर भट यांच्या नावावर असलेली शिवाजी मंदिरच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील जागा, तसेच त्यांच्या नावावर असलेली बस आणि संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीची हिशेब पत्रके देण्यास गोपाळ अलगेरी यांनी मध्यंतरीच्या काळात नकार दिला होता. त्यामुळे आम्ही त्यांना आमचे वकील अॅड.शिरीष देशपांडे यांच्यामार्फत नोटीस पाठवली. परंतु त्यांनी नोटिशीला उडवाउडवीची उत्तरे दिली. या संदर्भात आम्ही ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या मध्यस्तीनेतडजोड करण्याचा तसेच वकिलांच्या मार्फत तीन वेळा चर्चेचा प्रयत्नही केला होता. पण त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. पण आता १९ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्यात व गोपाळ अलगेरी यांच्यात ‘समजुतीचा करारनामा’ झाला आहे. त्यानुसार शिवाजी मंदिर येथील जागा व बस आमच्या नावावर झाली आहे. ‘सुयोग’ संस्थेची कुठलीही देणी-घेणी उरली नाहीत. हिशेबामध्ये फक्त इन्कमटॅक्सची जबाबदारी ७५ व २५ टक्के अशी ठरली आहे. यापुढे सुधीर भट यांचा वारसा माझा मुलगा संदेश भट चालविणार असून, तो नाट्यनिर्माता म्हणून काम पाहणार आहे. (प्रतिनिधी)सुधीर भट यांचे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाल्यानंतर ‘सुयोग’ या संस्थेत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गोपाळ अलगेरी यांनी ‘सुयोग’ची धुरा हाती घेतली. तेव्हापासून कांचन भट, तसेच त्यांचे पुत्र संदेश भट आणि गोपाळ अलगेरी यांच्यात या संस्थेच्या हक्कावरून वादाची ठिणगी पडली होती.
भट परिवाराच्या ओंजळीत ‘सुयोग’
By admin | Published: February 23, 2016 1:00 AM