कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने भल्या भल्या शास्त्रज्ञांना पेचात टाकले आहे. एकीकडे संकमणाचा मोठा वेग दाखवतोय, तर दुसरीकडे गंभीर लक्षणे किंवा आजारीदेखील करत नाहीय. पण यामुळे गाफिल राहून चालणार नाहीय, हे शास्त्रज्ञांना चांगलेच माहितीये. ओमायक्रॉनवर नवीन लस आणण्यासाठी वेळ लागेल, परंतू गेल्या वर्षी अथक मेहनत घेऊन तयार केलेल्या लसी कितपत प्रभावी आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरु झाला आहे. अमेरिकेचे डॉ. रवी गोडसे यांच्यासह अनेकांनी कोव्हॅक्सिनचा बुस्टर डोस देण्याचा सल्ला दिला आहे.
अशावेळी कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटविरोधात आयसीएमआरचे वैज्ञानिक कामाला लागले आहेत. ओमायक्रॉनविरोधात कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन प्रभावी आहे हे तपासले जात आहे. दोन्ही लस बनविण्याच्या पद्धती या वेगळ्या आहेत. कोव्हॅक्सिन तर महागड्या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. यासाठी आयसीएमआरने डोंबिवलीत सापडलेल्या ओमायक्रॉनच्या महाराष्ट्रातील पहिल्या रुग्णाच्या नाक, घशातील स्वॅब घेतला आहे.
डोंबिवलीत सापडलेल्या रुग्णाच्या सॅम्पलमधून ओमायक्रॉनचा व्हेरिअंट वैज्ञानिकांनी आयसोलेट केला आहे. त्याला आपल्या लॅबमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हे काम आयसीएमआरच्या अतिसुरक्षित बायोसेफ्टी लॅबमध्ये केले जात आहे. याद्वारे वैज्ञानिकांना दोन उत्तरे सापडणार आहेत.
ओमायक्रॉन व्हेरिअंट कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनवर कितपत प्रभाव टाकू शकतो एक, आणि दुसरे जे लोक जुन्या कोरोना स्ट्रेनमुळे आजारी पडले होते, त्यांच्यातील अँटीबॉडी ओमायक्रॉनविरोधात लढण्यास सक्षम आहेत की नाही. असे झाल्यास देशावरील निम्मे टेन्शन दूर होणार आहे.
आयसीएमआरच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या सँपलमधून ओमायक्रॉन व्हेरिअंटला वेगळा करण्यासाठी कमीतकमी एका आठवड्याचा वेळ लागेल. यानंतर न्यूट्रलायझेशन स्टडी केला जाईल. हे या प्रश्नांच्या दिशेने पहिले पाऊल असणार आहे. लसीच्या प्रभावाचा शोध घेण्यासाठी न्यूट्रलायझेशन स्टडी महत्वाचा आहे. यामुळे रिइन्फेक्शनच्या शक्यतेचाही शोध लागणार आहे.