बुलडाणा : दूध अनुदानप्रश्नी विदर्भातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. दरम्यान, गनिमीकाव्याने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी ‘लोकमत’शीबोलताना दिले.दुसरीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी गेल्यावर्षी पुकारलेल्या संपादरम्यान काही मंत्र्यांना हाताशी धरून शासनाने शेतकर्यांच्या आंदोलनात फुट पाटण्याचा प्रयत्न केला होता तीच पद्धत दुध आंदोलनप्रश्नी वापरण्यात येत असल्याचे तुपकर यांचे म्हणणे आहे.प्रती लिटर पाच रुपयाप्रमाणे दुधाचे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभीमानीने १६ जुलै पासून मुंबईचे दूध तोडण्याचा इशारा दिला आहे. मध्यरात्रीपासून हे आंदोलन करण्यात येणार आहे.पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश सोबतच विदर्भातही या आंदोलनाची धार वाढविण्यात येणार असल्याचे तुपकर म्हणाले. दरम्यान, त्यानुषंगाने स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांच्या बैठकाही झाल्या असून हे आंदोलन गनिमी काव्याने करण्यात येणार आहे. बुलडाण्याचे कुलदैवत जगंदबा देवीला दुग्धाभिषेक करून या आंदोलनास प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे.दुसरीकडे दुधप्रश्नी स्वाभिमानी आक्रमक झाल्यानंतर काही संघांनी तथा शासनाने तीन रुपये वाढ करण्याची भाषा वापरून आंदोलनात फुट पाडण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप तुपकरांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रश्नी आक्रमक झाल्यानंतर दूध संघ आणि शासनाला तीन रुपये वाढ करण्याचे कसे सुचले असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी जोपर्यंत मागणी पूर्ण होणारनाही, तोपर्यंत मागे हटण्याचा प्रश्न नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, स्वाभिमानीचे पदाधिकारी राणा चंदन यांनी बुलडाणा जिल्ह्यातही आंदोलन होणार असल्याचे संकेत दिले. मात्र आंदोलनाचे नेमके स्वरुप काय असेल याबाबत त्यांनी माहिती मात्र दिली नाही.
सरकारला आंदोलनाला हिंसक वळण लावायचे?पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तो यशस्वी होणार नाही. आंदोलनात कर्जमुक्तीच्या आंदोलनाप्रमाणे काही मंत्र्यांना हाताशी धरून फुट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ही तुपकर यांनी स्पष्ट केले.