अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वर्चस्ववादाचा फटका भाजपा सरकारला बसला आहे. शनिवारी मध्यरात्री खोत यांनी आग्रह करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंदोलक शेतकऱ्यांची बैठक घ्यायला लावल्यानेच सरकार प्रचंड अडचणीत आल्याची भावना भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी, आॅक्टोबरच्या आत कर्जमाफी देणार, अशी घोषणा करूनही शेतकरी संपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यभर आनंदाचे वातावरण पसरायला हवे होते; पण झाले भलतेच. आंदोलन संपायला तयार नसताना कर्जमाफी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारे होर्डिंग्ज राज्यभर लावा, असे संदेश पक्षातर्फे पाठवले जात आहेत. मुंबईसह काही जिल्ह्यांत असे होर्डिंग्जही लागले आहेत, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने नाराजीच्या सुरात सांगितले. खा. राजू शेट्टी यांनी कर्जमाफीसाठी पदयात्रा काढली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा संप मिटवण्यात आपण पुढाकार घेऊ आणि आपल्यामुळे संप मिटला असे दाखवू असा विचार करत शनिवारी रात्री आंदोलक शेतकऱ्यांना स्वत:च्या घरी बोलावून घेतले. संपकऱ्यांसोबत रविवारी सकाळी ९ वाजता बैठक घेण्याचे ठरले होते. तसा निरोप कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही गेला होता. फुंडकर अकोला येथे शिवार सभेसाठी गेले होते. तो कार्यक्रम सोडून ते तातडीने मुंबईला रवाना झाले. मात्र रात्रीतूनच खोत यांनी बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला आणि फुंडकर सकाळी मुंबईत आले तर त्यांना कर्जमाफी झाल्याची बातमी मिळाली. याबाबत राज्यमंत्री खोत यांना विचारले असता ते म्हणाले, सगळे माझ्याकडे आले होते. आम्ही आंदोलन करायचो तेव्हा कोणी दखलही घेत नव्हते. इथे मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली व बैठक झाली. आता आंदोलकांनी खा. राजू शेट्टी यांचे नाव पुढे केले आहे त्याचे काय? असे विचारले असता ते म्हणाले, त्या वेळी कुठे खा. शेट्टी होते. त्यामुळे तेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली नाही. त्या वेळी जे आंदोलन करत होते त्यांच्यासोबत बैठक झाली आता त्यात नवीन लोक आले आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत बैठक करायची की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील, असेही ते म्हणाले. खा. शेट्टी यांनी सरकारचा पाठिंबा काढण्याची भूमिका घेऊ असे जाहीर केले आहे तसे झाले तर तुम्ही सरकारमधून बाहेर पडणार का? असे विचारले असता खोत यांनी आपण आजचे बोलू, तेव्हांचे तेव्हा पाहू, असे उत्तर दिले. तुम्ही मंत्री नसता आणि संघटनेत असता तर काय भूमिका घेतली असती, असे विचारले असता त्यावर खोत यांनी उत्तर दिले नाही.याआधी पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी जर शेतकरी संपावर गेले तर आम्ही बाहेरून माल मागवू असे विधान केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झालेला असताना पुन्हा खोत यांना पुढे करून बैठक घ्यायला नको होती, त्या बैठकीत भाजपाशी संबंधित संपकऱ्यांचे नेते बोलवायला नको होते अशी चर्चा आता भाजपाचे मंत्री करत आहेत.।खोत यांची पचाईतमुख्यमंत्र्यांकडची बैठक झाल्यानंतर संप न मिटवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यांची बैठकही पार पडली व त्यात खा. राजू शेट्टी यांना नेतृत्व देण्याची भूमिका काही सदस्यांनी घेतल्याने या सगळ्या आंदोलनाचे नेतृत्व आता खा. शेट्टी यांच्याकडे आले आणि खोत यांची चांगलीच पंचाईत झाली.
‘स्वाभिमानी’मुळे सरकार अडचणीत!
By admin | Published: June 07, 2017 4:38 AM