मुंबई - भाजपाकडून पक्ष प्रवेशाचे कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे येत्या 1 ऑक्टोंबरला स्वत:चा नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या 1 ऑक्टोंबरला नवीन पक्षाचा कार्यक्रम आणि संविधान आपण जाहीर करु असे नारायण राणेंनी सांगितले. सध्याच्या स्वाभिमान संघटनेचे पक्षात रूपांतर केले जाईल असे निश्चित झाले आहे. आता कृती करणे बाकी आहे, अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली.
नारायण राणे यांचा नवीन पक्ष भाजपाला पाठिंबा देईल. त्याबदल्यात त्यांना मंत्रिपद दिले जाईल असे टाइम्सने नारायण राणे यांच्या निकटच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. शिवसेना विशेषकरुन उद्धव ठाकरे यांच्याशी दोन हात करण्याच्या क्षमतेमुळे त्यांना मंत्रिपद मिळू शकते. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार राणेंना महत्वाचे महसूल खाते देण्याचा विचार करत आहे. या सर्व घडामोडींशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने टाइम्सला ही माहिती दिली. नारायण राणेंची आक्रमकता, महत्वकांक्षा लक्षात घेता त्यांना थेट पक्षात प्रवेश देण्याऐवजी एनडीएच्या माध्यमातून सोबत ठेवण्याची भाजपाची रणनिती आहे.
नारायण राणे सडेतोड, स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी स्वपक्षातील नेत्यांवरही अऩेकदा टीका केली आहे. त्यांचा हाच स्वभाव उद्या भाजपाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे त्यांना थेट पक्षात प्रवेश देण्यास भाजप नेतृत्व अनुकूल नाही. भाजपाने राणेंना एनडीएमध्ये आणून सावध खेळी खेळण्याची तयारी केली आहे.
राणेंसोबत किती लोक येतील, याचा अंदाज भाजपाने घेतला आहे. येणा-यांचे पुनर्वसन कसे करायचे, यासाठी चर्चेच्या दोन फे-या राणे यांच्या कार्यालयात झाल्या. त्या वेळी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हजर होते असे कळते.भाजपाचे पहिले लक्ष्य शिवसेना असेल. सेनेतील काही नाराज नेते थेट भाजपात जाऊ इच्छित नाहीत. त्यांना राणे यांच्या पक्षात प्रवेश दिला जाईल. त्याशिवाय मतदारसंघनिहाय स्थानिक गणिते, मतदारसंघातील भाजपाचे स्थान लक्षात घेऊन कोणाला थेट भाजपात आणि कोणाला राणे यांच्यामार्फत प्रवेश द्यायचे, याचे नियोजन सुरू असल्याचेही तो नेता म्हणाला.
राणे यांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे काही आमदार राणे यांच्या संपर्कात असले तरी ते पक्ष सोडण्याची शक्यता तूर्त नाही, राणे यांनी त्यांचा मुलगा नितेश यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मग आम्ही पक्ष का सोडावा, असा सूर काही काँग्रेस आमदारांमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ सप्टेंबरला परदेशातून येतील. शिवसेनेचे पक्षप्रमुख ३० तारखेच्या दसरा मेळाव्यात भूमिका जाहीर करतील. त्यानंतर या घडामोडी होतील.