पुणे : उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या कारखान्यांविरोधात मालमत्ता जप्तीची नोटीस बजावूनही कारवाई न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी न्यायालयात जाणार आहे. तसेच,अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली. राज्यातील १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली असून, उर्वरीत कारखान्यांकडे ३ हजार ५९५ कोटी रुपये थकीत आहेत. राज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पुण्यातील विघ्नहर कारखान्याचे सोमवारी गाळप संपले असून, यंदाचा हंगामही संपुष्टात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी शिष्टमंडळासह थकीत एफआरपी बाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सोमवारीभेट घेतली. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे ऊस बिल थकविणाऱ्या राज्यातील जवळपास ६२ साखर कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केली आहे. थकबाकी वसुलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीपिकेट (आरआरसी) बजावूनही जिल्हाधिकारी कारखान्यांवार कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अशा जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात येईल. तसेच, संघटनेच्या वतीने या जिल्हाधिकाºयांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही सुरु करण्यात येईल. याबाबत माहिती देताना साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, थकबाकीदार कारखान्यांवर आरआरसी करण्याची कारवाई सुरु असून, सोमवारी दिवसभरात आणखी सहा कारखान्यांवर कारवाई करण्यात आली. काही कारखान्यांवर तर, दोनदा आरआरआरसीची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील ३० कारखान्यांनी एकूण एफआरपीच्या ६० टक्के देखील रक्कम दिलेली नाही. -----------------------------------
साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केल्यानंतर महसुली वसुली करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. जिल्हाधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. थकबाकीदार कारखान्यांमध्ये बहुतांश कारखाने भाजपशी संबंधित नेत्यांचे आहेत. अगदी मित्र पक्षांच्या थकबाकीदार कारखान्यांवर देखील कारवाई झाली पाहीजे, अशीच आमची भूमिका आहे. त्यासाठी न्यायालय आणि आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला जाईल. खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
-----------------------
वाराणसीत प्रचाराला जायला आवडेल : शेट्टी
बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही मतदारसंघात १० मे नंतर प्रचाराला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात देखील प्रचाराला जायला आवडेल. मात्र, अजून तेथून निमंत्रण आलेले नाही. तसेच, जेथे गरज असेल तेथे प्रचाराला जाण्याची तयारी असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.