सांगलीतील तिढा सुटला; आघाडीची जागा स्वाभिमानीच्या पारड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 04:51 PM2019-03-28T16:51:15+5:302019-03-28T16:52:29+5:30
गेल्या रविवारी महाआघाडीची कराडमध्ये पहिली प्रचारसभा पार पडली. या सभेला मोठी गर्दी झाली होती.
मुंबई : महाआघाडीची पहिली प्रसारसभा पार पडली तरीही सांगलीची जागा कोण लढणार यावर मतैक्य होत नव्हते. शेजारच्या हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आज अर्ज भरला. अखेर सांगलीची जागाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली असून लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
गेल्या रविवारी महाआघाडीची कराडमध्ये पहिली प्रचारसभा पार पडली. या सभेला मोठी गर्दी झाली होती. या पूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपातील त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येकी दोन जागा मित्रपक्षांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्वाभिमानीला दोन जागा देण्यात आल्या होत्या. यापैकी हातकणंगलेतून राजू शेट्टी उभ राहणार होते. तर त्यांनी दुसरी जागा सांगलीची मागितली होती.
अखेर आज यावर शिक्कामोर्तब झाले असून शेट्टी यांनी लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले. तसेच वेळ पडल्यास आपल्या पक्षाच्या चिन्हावर काँग्रेसच्या नेत्याला उमेदवारी देण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे.