“मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांकडे द्यावी, कारण की...”; राजू शेट्टींचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:36 PM2023-10-18T15:36:26+5:302023-10-18T15:37:01+5:30
Raju Shetti News: अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
Raju Shetti News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू पाटील आत्मक्लेश यात्रा काढत आहेत. शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच या यात्रेदरम्यान राजू शेट्टी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे म्हटले जात आहे.
ऊसाचा मागच्या वर्षीचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्यावा, यासाठी ही आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही. तर यंदाचा ऊस गळीत हंगामा सुरू करून देणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तसेच कारखान्यात वजन काटे डिजिटल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. या यात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांकडे द्यावी
राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवार यांच्या हातात द्यावीत. अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, काही दिवसांआधी राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांना सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. सध्याच्या सरकारमध्ये, सत्तेत काहीही उरलेले नाही. सरकारमधून बाहेर पडा. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लढा देऊ. शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते.
दरम्यान, या आवाहनानंतर बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर काही कयासही राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांच्या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी ही पदयात्रा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.