कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे होम क्वारंटाईन झाले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वत: राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.राजू शेट्टी विविध कामांसाठी महाराष्ट्रात विविध कारणांसाठी फिरत असतात. यादरम्यान अनेकांशी संपर्क झाल्याने त्यांनी गुरुवारी कोरोना चाचणी करवून घेतली.
ही चाचणी निगेटिव्ह आली, परंतु गुरुवारी रात्री त्यांना थोडा ताप येउन अस्वस्थ वाटू लागल्यामुळे डॉ. सतिश पाटील यांच्याकडे त्यांनी एचआरसीटी चाचणी केली. तेव्हा फुफ्फुसात थोडा फार संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही लक्षणे कोरोनाची असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच राहून उपचार सुरु केले आहेत.शुक्रवारी सकाळी राजू शेट्टी यांनी फेसबुकसह इतर सोशल मिडियावरुन ही माहिती दिली आणि बरेच लोक माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी येत असतात, मी विविध कारणांसाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, त्यामुळे माझ्या संपर्कात येउन आपल्या परिवाराला धोक्यात न घालता, फोनवरुन चर्चा करा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे.
कोरोना मान-सन्मान ठेवत नाही, तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो, त्यामुळे माझ्या संपर्कात आल्याने आपण सुरक्षित राहाल, हा भ्रम मनातून काढून टाका. माझ्या संपर्कात आल्याने दुसऱ्या कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला तर माझ्या मनावर त्याचं ओझं राहील, याची जाणीव ठेवून मी काही काळासाठी स्वत:ला घरी क्वारंटाईन करण्याचं ठरवलं आहे, कृपया आपणही मला या गोष्टीसाठी साथ द्या. विसरु नका, कोल्हापूर-सांगलीकरांनो कोरोनाला हरवायला.- राजू शेट्टी,संस्थापक नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना