बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका बैठकीसाठी मुंबईला जात असताना तुपकर यांच्या गाडीला दुचाकी धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्वतः तुपकर यांनी जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविकांत तुपकर सोमवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबईच्या दिशेने जात होते. यादरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण दुचाकीवरुन रस्ता ओलांडत होते. दुचाकीचा वेग जास्त असल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट तुपकर यांच्या इनोव्हा गाडीवर धडकली. अपघातानंतर तुपकर जखमींना घेऊन औरंगाबादकडे रवाना झाले.
गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमींची नावे आहेत, ते दोघेही येवता येथील रहिवासी आहेत. अपघातात तुपकर यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. पण, सुदैवाने तुपकर आणि त्यांचा ड्रायव्हर सुखरुप आहेत. 24 नोव्हेंबर रोजी मुंबईत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याच बैठकीसाठी रविकांत तुपकर मुंबईकडे जात होते.