बारामती: दुधदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बारामतीत २७ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातुन माजी खासदार राजु शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.त्यानंतर राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचे 'मैत्री'पर्व सुरु झाल्याचे मानले जात असतानाच या मोर्चाची बातमी येवुन धडकली आहे.त्यामुळे या मैत्रीपर्वाला छेद जाणार का,याबाबत चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीपासुन शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस— काँग्रेससोबत जवळीक साधली आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चार जागा मिळणार आहेत.या कोट्यातुन शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.त्यानंतर रासप,भाजपपाठोपाठ स्वाभिमानीच्या वतीने आता बारामतीत दूध दरवाढीसाठी जनावरांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.त्यासाठी माजी खासदार राजु शेट्टी उपस्थित राहणार आहेत.
राज्य शासनाने दुधाला शेतकऱ्याला थेट प्रतिलीटर पाच रुपये अनुदान द्यावे,दुध उत्पादनावरील जीएसटी केंद्र सरकारने रद्द करावा,केंद्रसरकारने १७ जुन रोजी १० हजार टन दुध पावडर आयात केल्याचा निर्णय मागेघ्यावा,सरकारने ५ हजार टन दुध पावडरचा बफर स्टॉक करावा,दुध पावडर निर्यातीस ५० रुपये थेट प्रोत्साहन पर अनुदान द्यावे,दुध उत्पादकाचे दरवर्षी होणारे हाल थांबविण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढावा,खासगी डेअऱ्यांकडुन दुध उत्पादकांची होणारी पिळवणुक थांबविण्यासाठी शासनाने त्वरीत लक्ष घालावे,आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.याबाबत स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, बारामती तालुका युवाअध्यक्ष विकास बाबर यांनी माहिती दिली.