मुंबई : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानसभेच्या 12 जागा देण्यात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा केली. आज त्यांनी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केली. महायुतीमध्ये स्वाभिमानीला 12 जागा देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रंनी सांगितले.
याबाबत खोत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नेमका आकडा सांगण्यास नकार दिला. मात्र ते म्हणाले, राजू शेट्टी हे रविवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी ‘मातोश्री’वर चर्चा करतील. भाजपाशी झालेल्या चर्चेत त्यांनी आमच्यासाठी किती जागा सोडायच्या हे ठरले आहे. महायुतीमध्ये लहान पक्षांच्या जागांचे वाटप आधी केले जाईल असे भाजपा, शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार पहिला क्रम हा स्वाभिमानीचा लागला आहे. फडणवीस आणि रावतेंबरोबरच्या चर्चेत देऊ केलेल्या जागांच्या आकडय़ाबाबत आपण समाधानी आहात का, या प्रश्नात खोत म्हणाले की, सगळी अपेक्षा पूर्ण झालेली नाही. सन्मानजनक जागा मिळत आहेत. महायुतीचे पहिले लक्ष्य आघाडी सरकारला सत्तेतून घालविण्याचे आहे. त्यासाठी सर्वच घटक पक्षांना तडजोड करावी लागणार आहे. भाजपापेक्षा शिवसेनेच्या कोटय़ातील जास्त जागा स्वाभिमानीला दिल्या जाणार आहेत. कारण, पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग स्वाभिमानीचा प्रभावपट्टा आहे तिथे युतीमध्ये शिवसेनाच जास्त जागा लढत आली आहे. त्यामुळे जास्त फटका शिवसेनेला बसणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वाभिमानीशी आमची चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्यांचे समाधान होईल, असे जागावाटप होईल. (विशेष प्रतिनिधी)