ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 5 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय गोटात सुरू आहे. पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपाची वाट धरणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सदाभाऊ खोत यांनी भाजपाप्रवेशाच्या बातम्या निराधार असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती फेटाळून लावली आहे.
तर दुसरीकडे, आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि त्यांच्या आदेशानुसारच काम करायचे आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. राज्याच्या हितासाठी सरकार जी जबाबदारी देईल ती पार पाडणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, भाजपाने सदाभाऊ खोत यांना अधिकची मंत्रिपदं देऊ केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच राहणार की भाजपाप्रवेश करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.