ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबईतील स्वामी नारायण मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराशी भेदभाव केल्याची संतापजनक घटना गुरुवारी सकाळी घडली. जैन समाजातील संत कार्यक्रमाला उपस्थित होते व महिलांना त्यांच्यासमोर बसता येत नसल्याचे सांगत आयोजकांनी महिला पत्रकाराला तिथे बसण्यास मज्जाव केला. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात महिलेचाच अपमान केला गेल्याने समाजातील सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे.
राज्यांत गोवंश हत्याबंदीचा कायद्याची अंमलबजावणी केल्यानिमित्त स्वामी नारायण मंदिरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वृत्ताकनांसाठी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकार रश्मी पुराणिक या स्वामी नारायण मंदिरात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी पत्रकारांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिल्याचे आयोजकांनी सांगितले होते. यानुसार रश्मी पुराणिक पहिल्या रांगेत जाऊन बसल्या. यानंतर आयोजकांमधील काही जण तिथे आले व त्यांनी रश्मी पुराणिक यांना तीन रांगा सोडून बसायला सांगितले. रश्मी पुराणिक यांनी जाब विचारला असता पहिल्या तीन रांगा या पुरुषांसाठी असतात, महिलांनी या रांगेत बसता कामा नये, तुम्ही मागच्या रांगेत जाऊन बसा असे सांगितले. याविषयी माहिती देताना आयोजक म्हणाले, आमच्या समाजात स्त्री - पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. पण समाजातील काही संत कार्यक्रमात उपस्थित होते. या संतांसमोर महिलांनी बसू नये असा नियम आहे. या भेदभावाकडे रश्मी पुराणिक यांनी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांचे लक्ष वेधले. शेलार यांनीही आयोजकांना महिला पत्रकारांना पहिल्या रांगेत बसू देण्याची विनंती केली. शेलार तिथून निघताच आयोजक पुन्हा तिथे आले व त्यांनी रश्मी पुराणिक यांना तिथे बसण्यास मज्जाव केला.
स्वामी नारायण मंदिरात महिला व पुरुषांमध्ये झालेल्या या भेदभावाचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. तर प्रगतीशील महाराष्ट्रात अजूनही महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही बदलू शकलेला नाही, हा प्रकार पुरोगामी राज्यासाठी अशोभनीय आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार नीलम गो-हे यांनी दिली आहे. मंदिर प्रशासनाने या घटनेशी आमचा संबंध नसून कार्यक्रमाचे आयोजन सांताक्रूझमधील जैन संघाने केले होते असे स्पष्ट केले आहे.
या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध सुरु झाल्यावर सत्कार समारंभाठिकाणी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांना चांगलेच सुनावले. आपण २१ व्या शतकात राहत असून स्त्री - पुरुष भेदभाव करणा-या गोष्टी ताबडतोब बंद करा असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी सुनावले आहे. तर सांताक्रूझ जैन संघाने या कार्यक्रमानंतर प्रसिद्धीपत्रक त्यांची भूमिका मांडली आहे. कार्यक्रमाच्या संयोजकांनी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती, यानुसार महिलांनी तिथे बसावेे असे संबंधीतांना सांगण्यात आले होते असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.