सांगली : उसाचे थकीत बिल द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर हल्ला चढविला. लेखा विभाग, साखर, रोखपाल, तोडणी व संगणक विभागातील खिडक्यांच्या, केबिनच्या तसेच टेबलच्या काचा फोडल्या. दोन संगणकही फोडले. खुर्च्या, टेबल भिरकावले. या प्रकारामुळे भीतीने कर्मचाऱ्यांनी तेथून पलायन करून दुसऱ्या विभागात आश्रय घेतला. मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेनंतर कारखाना तसेच कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.साखर कारखान्याचा तीन महिन्यांपूर्वी गळीत हंगाम संपला आहे. वसंतदादा कारखान्याची २०१३ ची १५ कोटींची, तर २०१४ ची ३१ कोटींची बिले थकीत आहेत. ही बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. बिले द्यावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी जिल्ह्णातील सर्व साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढली होती. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानीच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता वसंतदादा कारखान्यावर धडक मारली. कारखान्याच्या मुख्य गेटमधून थेट लेखा विभागाजवळ तोड फोड करत घोषणा दिल्या.
वसंतदादा कारखान्यावर ‘स्वाभिमानी’चा हल्ला!
By admin | Published: June 10, 2015 2:13 AM