ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - आज दिनांक 26 फेब्रुवारी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 51 वा आत्मार्पण दिन. ज्याचा जन्म या भारतमातेसाठी झाला त्या या महापुरूषाने आपले सारं आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केलं. मुख्य म्हणजे याच देशासाठी मृत्यूलाही कवटाळलं.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे,इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचापुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
वयाच्या सोळाव्या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांनी शपथ घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम पाळली. वयाच्या तिसाव्या वर्षी ५० वर्षे काळे पाणी अशी सर्वात मोठी शिक्षा झालेला हा जगातील एकमेव देशभक्त. ज्यांच्यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधानाने माफी मागितली आणि फ्रान्स पंतप्रधानाने राजीनामा दिला असा एकमेव क्रांतिकारक म्हणजे सावरकर. भारतास स्वातंत्र्य मिळवण्यात सिंहाचा वाटा सावरकरांचा होता. मात्र, जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सावरकर कुटुंबाला ध्वजारोहण सोहळ्याचे साधे निमंत्रणही गांधी-नेहरुंच्या शासनाने दिलं नाही आणि त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं जातं.
1948 ला महात्मा गांधींची हत्या झाली आणि सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप ठेऊन त्यांना वयाच्या ६५ व्या वर्षी कैद केले. पुढे पुन्हा नेहरु-लियाकत भेटीच्या वेळी वयाच्या ७० व्या वर्षी तुरुंगात टाकले. पण तरीही या महापुरुषाने चकार शब्द काढला नाही. थोडक्यात काय तर ब्रिटीशांनीही सावरकरांना त्रास दिला आणि हिंदुस्थान शासनानेही त्रासंच दिला. त्यांची शासनाने हिरावून घेतलेली जमिन त्यांना परत केली नाही.
पुढे भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजयश्री खेचून आणली, तरीही भारताने अन्यायकारक अटी मान्य करून अख्या जगात अपमान करुन घेतला तेव्हा सावरकर म्हणाले, 'यापेक्षा अधिक मी भारताचा झालेला अपमान सहन करु शकत नाही'. त्यानंतर 26 फेब्रुवारी, 1966 ला सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संघटनेचं विसर्जन केलं आणि माझ्या आयुष्याचं आणि संघटनेचं ध्येय आता संपलं आहे, यापुढे देशाची सेवा करता येणार नाही असं म्हणून त्यांनी अन्नत्याग केला आणि आपला देह ठेवला. अशा या महापुरुषाला लोकमतकडून विनम्र अभिवादन.