लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘हमसे आठ-दस साल बड़ी होकर भी, स्वातीजी कभी थकती नहीं थीं. उनका हौसला देखकर हम भी थकावट भुलकर उनके साथ दौड़ते थे,’ या भाषेत चेन्नईच्या प्रशिक्षण तळावर लेफ्टनंट पदाची सूत्रे घेणाºया अनेक सहकारी तरुणींच्या तोंडून स्वाती महाडिक यांच्या जिद्दीची कहाणी उलगडत गेली. हे ऐकताना शेजारीच उभारलेल्या स्वाती यांच्या कुटुंबीयाला मनापासून अभिमान वाटला.
जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या अंत्यविधी प्रसंगी स्वत: सैन्यात रुजू होऊन देशसेवा करण्याची व्यक्त केलेली इच्छा पत्नीस्वाती महाडिक यांनी सत्यात उतरविली. स्वाती महाडिक लेफ्टनंटपदी रुजू झाल्या असून चेन्नईत शनिवारी थाटात दीक्षांत समारंभ पार पडला. विशेष म्हणजे या सरावात त्या ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून गौरविल्या गेल्या आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथील देहूरोड येथे होणार आहे.
स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना लष्करात दाखल होण्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी वयाची अट शिथील केली होती. त्यांचा देशसेवेचा दृढ निश्चय आणि समाजाप्रती बांधिलकी पाहून, आम्हाला प्रभावित केलं, असं लष्कराच्या अधिकाºयांनी सांगितलं.खडतर सरावगेल्या दीड वर्षांत तब्बल चाळीस किलोमीटर पळण्याच्या खडतर सरावातही स्वाती कधी थकल्या नाहीत. उलट त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणाºया तरुणीही मागे पडत. मात्र स्वाती यांची जिद्द पाहून इतरांनाही हुरूप यायचा. आपला थकवा विसरुन त्याही स्वाती यांच्या सोबत परिश्रम घ्यायच्या.चर्चा फक्त स्वातींचीच..!चेन्नईतल्या आॅफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील कार्यक्रमात स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंटपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीय चेन्नईत दाखल झालं होतं. पालकांच्या हस्तेच स्टार खांद्यावर लावण्याचा ‘पिपिंग सेरेमनी’ मोठ्या उत्साहात याठिकाणी साजरा झाला. देशभरातून सर्वांचेच पालक याठिकाणी आले असले तरी प्रत्येकाच्या नजरेत स्वाती यांच्याबद्दलच कौतुक होतं. ज्याच्या-त्याच्या तोंडी स्वाती यांनी घेतलेल्या मेहनतीचीच चर्चा होती.