कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या नव्या महापौर पदासाठी सोमवारी सत्तारूढ काँग्रेसकडून स्वाती सागर यवलुजे यांची, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. येत्या शुक्रवारी (दि. २२) महापौर-उपमहापौर निवड होणार आहे. सभागृहात दोन्ही काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्याने यवलुजे व पाटील यांची निवड होण्यास अडचण नाही. परंतु धोका नको म्हणून सत्तारूढ आघाडीने आजच सदस्यांना सहलीवर पाठवून दिले.महापालिकेच्या ८१ सदस्यांच्या सभागृहात दोन्ही काँग्रेसकडे ४४ सदस्य आहेत. शिवसेनेचे ४ सदस्य आहेत; परंतु ते सत्तारूढ आघाडीसोबत आहेत. विरोधात भाजपा व ताराराणी आघाडी असून त्यांच्याकडे ३३ सदस्य आहेत. प्रत्येक वर्षी महापौर बदलण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसने घेतल्याने मावळत्या महापौर हसिना फरास यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. स्वाती यवलुजे या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या गटाच्या आहेत. महापौर पदासाठी यवलुजे यांच्यासह दीपा मगदूम व उमा बनछोडे यांनी आपल्याला संधी मिळावी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती; परंतु यवलुजे या आमदार पाटील यांचे होमपीच असलेल्या कसबा बावड्यातून निवडून आल्या असल्याने त्यांना ही संधी मिळाली. विरोधी आघाडीकडून महापौर पदासाठी भाजपाच्या मनीषा कुंभार व ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांना उमेदवारी दिली आहे.सध्याचे महापौर पदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी आहे. या महापौर पदाची अडीच वर्षांची मुदत मे २०१९मध्ये संपत आहे. त्यामुळे नव्या महापौरांना कशीबशी ५ महिन्यांचीच सत्तेची संधी मिळेल. त्यानंतर पुन्हा अडीच वर्षांसाठी महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले आहे.
कोल्हापूरच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून स्वाती यवलुजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 2:48 AM