सातारा : ‘शेतकऱ्यांसाठी सहकार चळवळ उभी केली; पण सध्या छोट्या शेतकऱ्यांसाठी सहकार हा शब्द स्वप्न ठरले आहे. कारण सहकार चळवळ पश्चिम महाराष्ट्रात काही परिवारांची मालमत्ता बनली आहे. त्यासाठी सामान्य घरातील झाडू दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला. तसेच महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपचे संघटन वाढविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे,’ असे प्रतिपादन ‘आम आदमी’चे महाराष्ट्राचे सहप्रभारी राजीव मिश्रा यांनी केले. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बातचित केली. यावेळी महिला कार्यकर्त्यां आभा मुळे, ‘आप’चे जिल्हा संयोजक एस. आर. भोगावकर, निरस मलिक, विजय यादव, अॅड. विकास साबळे, अॅड. इम्तियाज खान, उत्तम सावंत, विजयकुमार धोतमल, अतुल भोसले, विशाल कोळी, कृणाल चिकणे, अॅड. विजय खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. मिश्रा म्हणाले, ‘सत्तेच्या माध्यमातून सहकार व्यवस्था बिघडून गेली आहे. सहकारी चळवळीचा वापर स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी होऊ लागला आहे. काही परिवारांची मालमत्ता बनलेल्या साखर कारखाना, सूतगिरणी व इतर संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारामुळे सामान्य सभासदांना न्याय मागणे कठीण झाले आहे. दहशतवाद व दडपशाही यातून निवडणूक होत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी प्रामाणिक व जागरुक पत्रकारांनी पुढाकार घेऊन सामान्य शेतकऱ्यांना सहकारातील अधिकार मिळवून देण्यासाठी पुढे आले पाहिजे.’‘देशात काँग्रेस व भाजप असे दोन पक्ष सत्ता वाटून घेत होते; परंतु आप पक्षाने लोकांचे प्रश्न हाती घेऊन आंदोलन केले. लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे सामान्य घरातील झाडू दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला. महाराष्ट्रातही हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपचे संघटन वाढविण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. काँग्रेस व भाजप यांना रोखण्याचे काम फक्त आप करू शकतो; कारण जनतेला आता पर्याय हवा आहे. हे दिल्लीतील मतदारांनी दाखवून दिले आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
काँग्रेस-भाजपला रोखण्यासाठी ‘झाडू’: मिश्रा
By admin | Published: November 15, 2015 8:31 PM