अक्षय चोरगे/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात चढ-उतार नोंदवण्यात येत असून, वातावरणात बदलही होत आहेत. ढगाळ हवामानासह ऊन्हाचा कडाका वाढत असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. अशाच ‘ताप’दायक उन्हाळ्याचा त्रास पशू-पक्ष्यांना होत असून, मागील चार महिन्यांत परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात तब्बल एक हजारांहून अधिक पशू-पक्ष्यांवर उपचार करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यांत ३००हून पशू-पक्ष्यांवर उपचार करण्यात आले आहेत.पशुवैद्यकीय रुग्णालयाचे सचिव डॉ. जे. सी. खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५५० जनावरांवर उपचार सुरू आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी उपचारासाठी आलेल्या पक्ष्यांची संख्या २५ ते ३० टक्के जास्त आहे. शहरात पक्ष्यांना विसाव्यासाठी जागा नसल्याने पक्षी दिवसभर उडत राहतात. मात्र, सध्याच्या तापदायक ऊन्हाचा फटका पक्ष्यांना बसतो आहे. घुबड हा पक्षी जेव्हा ऊन्हात उडतो, तेव्हा तो लवकर थकतो आणि उष्माघातामुळे कोसळतो. शरीरामधील पाण्याच्या कमतरतेमुळे पक्षी थकून खाली कोसळतात. अनेक वेळा पक्षी जर सरळ जमिनीवर कोसळले, तर ते मरून जातात आणि जर झाडाच्या फांदीमध्ये, तारेमध्ये अडकले, तर ते जखमी होतात. यावर त्या पक्ष्यांना रुग्णालयात आणले जाते, येथे त्यांच्यावर उपचार केले जातात. मांजर आणि कुत्र्यांनासुद्धा उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात त्यांच्यामध्ये त्वचेच्या समस्या निर्माण होतात. त्यांनासुद्धा पाण्याच्या कमतरतेमुळे उष्माघताचा त्रास होतो. शहरातील भटकी कुत्री आणि मांजर यांना पाणी मिळाले नाही, तर अशा वेळी ते मिळेल ते किंवा अशुद्ध पाणी पितात. परिणामी, त्यांना आजार होतात.कोणते उपाय कराल?घराच्या गच्चीवर अथवा गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याचे एक भांडे ठेवावे. त्यातील पाणी वेळोवेळी बदलावे.थोडेसे ज्वारी अथवा इतर धान्यांचे दाणे ठेवावे.कुत्र्यांना-मांजरांना जर वातानुकूलित घरात ठेवत असाल, तर त्यांना लगेच बाहेर ऊन्हात नेऊ नका.कुत्र्यांना-मांजरांना उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो मांसाहार देऊ नये. जो आहार देत आहात, तो दिवसातून दोन-तीन वेळा थोडा-थोडा द्यावा, पाणी वेळोवेळी द्यावे.जखमी पक्षी, भटकी अशक्त कुत्री दिसली, तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे.जखमी पक्ष्याला सुरुवातील पाणी किंवा ग्लुकोजयुक्त पाणी दिले जाते. थोड्या वेळाने त्यांना मल्टीव्हिटॅमिन, अँटी बायोटिक सीरप दिले जाते.दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा जास्त कडक आहे. निसर्ग मित्रांनी, पक्षीप्रेमींनी अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे; त्या ठिकाणी पक्ष्यांचे जगणे सुसह्य झाले आहे, परंतु ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, तेथे पक्ष्यांचे हाल होत आहेत. आपण सर्वांनी या कामी पुढाकार घेणे गरजेचे आहे.- विजय अवसरे, निसर्गमित्रउपचार सुरू असलेले पशू-पक्षीपशु/पक्षीसंख्याकबुतर२७२घार१५०कावळा१४कोकिळा९ घोडे२४बैल५२मागील चार महिन्यांत उपचार झालेले पक्षीपक्षीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलकबुतर१५२१६७१७२१७२घार५४६६८२६७कोकिळा१५१७२०१८घुबड१८२०२६२५पाणपक्षी१५१६१६२१
ऊन्हाचा फटका पक्ष्यांना
By admin | Published: May 06, 2017 6:47 AM