मुंबई : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा नवीन भरतीपूर्वी राबविण्यात येईल. तसेच २०२२ मध्ये केलेल्या अर्जात बदल करण्याची आणि अर्ज न केलेल्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात येईल. तसा शासन आदेश ३ नोव्हेंबर रोजी उपसचिव तुषार महाजन यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता.
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सध्या राबवत असून, २०२२ मध्ये ऑनलाइन अर्ज केलेल्या शिक्षकांचाच विचार यात केला जाणार होता. त्यावेळी अनेक शिक्षकांनी स्वजिल्ह्यात जागा नसल्याने अर्ज केला नव्हता किंवा उपलब्ध जागेनुसार इतर जिल्ह्यांचे पर्याय दिले होते.
नव्याने अर्ज करा किंवा निर्णय बदलण्याची संधीअर्ज न केलेल्यांना अर्ज करण्याची संधी द्यावी आणि ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांना त्यात बदल करण्याची संधी द्यावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व नीलेश देशमुख यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत केली होती. ती पूर्ण करण्याचे आश्वासन त्यावेळी केसरकर यांनी दिले होते. त्याची परिपूर्ती या आदेशाने झाली आहे. आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा राबवून २०२२ मध्ये अर्ज केलेल्यांना त्यात बदल करण्याची संधी दिली जाईल. तसेच अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळेल. शिक्षणमंत्र्यांनी याला मान्यता दिली असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी सहावा टप्पा सुरू- काही शिक्षकांचे संवर्ग बदलले आहेत, तर काही शिक्षकांच्या स्वत:च्या जिल्ह्यातील जागा आता रिक्त झाल्या आहेत.- शासनाच्या या नवीन आदेशामुळे शिक्षकांना अर्जात बदल करण्याची किंवा नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली. - ही आम्हाला शासनाने दिलेली दिवाळी भेट असल्याचे शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ही तर दिवाळी भेट शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा विषय ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला आहे.शिक्षक सहकार संघटनेने यासाठी वारंवार आंदोलन केले. दिवाळीच्या तोंडावर या आंदोलनाला यश आले.