मुंबई : महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योजकतेस प्रोत्साहन देऊन महिलांच्या सबलीकरणाचे काम करणाऱ्या ‘स्वयंम शिक्षण प्रयोग’ या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने पर्यावरण रक्षण करून हवामान बदल रोखण्यासाठी केलेल्या कार्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने गौरव केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे येत्या नोव्हेंबरमध्ये मर्राकेश येथे होणाऱ्या हवामान बदलाविषयीच्या जागतिक शिखर परिषदेत जगभरातील ज्या १३ स्वयंसेवी संस्थांचा विशेष पुरस्कार करून गौरव करण्यात येणार आहे, त्यात ‘स्वयंम शिक्षण प्रयोग’चा समावेश आहे.महिला बचत गटांच्या माध्यमातून सौर दिवे, सौर चुली यासारख्या स्वच्छ ऊर्जा उत्पादनांची तसेच पर्यावरणस्नेही अशा जलप्रक्रिया व स्वच्छता उत्पादनांची निर्मिती व वितरण करण्याचे जाळे महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांच्या ग्रामीण भागात विणल्याबद्दल या संस्थेला हा बहुमान मिळाला आहे. या माध्यमातून या संस्थेने एक हजाराहून छोट्या महिला उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे करून स्वयंपूर्णतेचा व सबलीकरणाचा मार्ग दाखविला आहे.संस्थेच्या या कामांमुळे हवेत होणारे कार्बनचे उत्सर्जन कमी होण्यास मोठा हातभार लागल्याचे ‘युएनएफसीसीसी’ या हवामान बदलाविषयीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने हा पुरस्कार जाहीर करताना नमूद केले आहे. या संस्थेचे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांत मोठे काम आहे. भारतात विशेषत: ग्रामीण भागांत अजूनही ८.४१ कोटी लोक अन्न शिजविण्यासाठी व प्रकाशासाठी जळणाचा वापर करतात व त्यामुळे त्यांना श्वसनाचे रोग होतात. या संस्थेच्या कामामुळे दोन लाखांहूनही अधिक महिला आणि कुटुंबे सौर दिवे आणि सौरचुलींचा वापर करून एरवी जळणासाठी जे वापरले गेले असते अशा सुमारे १०० टन लाकडाची दररोज बचत करून हवामान बदल रोखण्यास तेवढाच हातभार लावत आहेत.हवामान बदलाविषयीच्या पॅरिस करारास भारताने ज्या दिवशी औपचारिक संमती दिली त्याच दिवशी भारतातील या संस्थेस त्याच क्षेत्रात केलेल्या कामासाठी हा पुरस्कार जाहीर व्हावा, हे विशेष उल्लेखनीय आहे.स्वयंम शिक्षण प्रयोगच्या सहसंस्थापिका प्रेमा गोपालन यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून संस्थेच्या कामाला जागतिक पातळीवर पोंचपावती मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.सन १९८९ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या या ‘एनजीओ’ला महाराष्ट्र सरकार, यूएलएड, मिसेओरर, युरोप इत्यादींकडून अर्थसाह्य आणि एचएसबीसी बँक व अलस्टॉम या कंपनीकडून ‘सीएसआर’ निधीही मिळालेला आहे. (विशेष प्रतिनिधी)>महाराष्ट्र सरकारने महिलांना त्यांच्या उपक्रमातून निर्माण होणारी अतिरिक्त सौरऊर्जा ग्रीडला पुरविण्यासही मुभा दिली आहे. देशातील सर्वच राज्यांनी अशी अनुकूल धोरणे स्वीकारली तर भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.-प्रेमा गोपालन, सहसंस्थापक, स्वयंम शिक्षण प्रयोग>या संस्थेने दाखविलेली दिशा व केलेल्या मदतीमुळे आज आमच्या गावातील दोन हजाराहून अधिक कुटुंबे सौरदिवे आणि सौरचुलींचा वापर करीत आहेत.-निता तनवंडे, महिला उद्योजिका, सावरगाव, ता. तुळजापूर
‘स्वयंम शिक्षण प्रयोग’चा संयुक्त राष्ट्रांकडून गौरव
By admin | Published: October 03, 2016 5:19 AM