मुंबई : वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे राज्यात स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. सोलापूरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीताराम संभाजी वाघमोडे (वय ५५) यांचे शुक्रवारी ‘स्वाईन फ्लूू’ने निधन झाले. पुण्यात एका ५७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १९ वर पोहोचली आहे. नाशकातील बळींचा आकडाही १३ वर गेला आहे. विदर्भातील अकोल्यातही याचे लोण पसरले असून दोन पॉझिटिव्ह रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.राज्य सरकारने पुण्याला हाय अलर्ट दिला आहे. जानेवारीपासून ११३ रुग्णांची नोंद झाली असून, १९ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३५ स्वाईन फ्लूचे रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील ९ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात महिनाभरात स्वाइन फ्लूचे सात बळी गेले. त्यामुळे बळींची एकूण संख्या १३ झाली असून, त्यातील शहरातील तीन, तर शहराबाहेरील दहा जणांचा समावेश आहे. त्यात नामपूर, सांगवी ता. सिन्नर, सटाणा, सिडको नाशिक, चांदोरी (ता. निफाड), पिंगळवाडे (ता. सटाणा), उंटवाडी घुगेवाडा, रविवार कारंजा, भगूर येथील रुग्णांचा समावेश आहे. तसेच पालसखेड ता. संगमनेर, नंदकुसुंबा, ता. धुळे, कोपरगाव येथील रुग्णही दगावले आहेत. प्रामुख्याने, नगर-कोपरगाव भागातील संशयित रुग्णांची संख्या जास्त आहे. विदर्भातील अकोल्यातही दोन रुग्ण आढळले आहेत. एक रुग्ण अमरावती येथील तर दुसरा रुग्ण अकोला शहरातील नानक नगर, निमवाडी परिसरातील आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेस नेते सीताराम वाघमोडे यांचा मृत्यू-सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व चिल्ड्रन एडचे या संस्थेचे माजी अध्यक्ष सीताराम संभाजी वाघमोडे (वय ५५) यांचे शुक्रवारी पहाटे अडीच्या सुमारास ‘स्वाईन फ्लूू’ने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, चार बहिणी, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी जवळा येथील मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सीताराम वाघमोडे यांना १५ मार्च रोजी डेंग्यूची लागण झाल्यामुळे सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्यांना निमोनिया व स्वाईन फ्लू झाल्याचे सांगण्यात आले़ त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचाराकरिता पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना रस्त्यातच प्राणज्योत मालवली़ सध्या सोलापुरात विविध रुग्णालयात स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण उपचार घेत आहेत़.
राज्यात स्वाईन फ्लूचा पुन्हा उद्रेक
By admin | Published: March 25, 2017 2:20 AM