अकोला : निमवाडी परिसरातील नानक नगरात राहणाऱ्या एका रुग्णाचा स्वाइन फ्लू आजाराने बुधवारी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शहरामध्ये अनेक दिवसांपासून स्वाइन फ्लूसारख्या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असून, सातत्याने स्वाइन फ्लूने बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत चार जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. नानक नगरातील ४४ वर्षीय इसमाला स्वाइन फ्लूची बाधा झाल्याच्या संशयावरून खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पंधरा दिवसांपासून या रुग्णावर उपचार सुरू होते; परंतु प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. स्वाइन फ्लूने शहरात पाचवा बळी घेतला आहे. मृतक रुग्णावर सिंधी कॅम्पमधील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात वाढत्या स्वाइन फ्लूच्या प्रकोपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. दररोज स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण मिळून येत आहेत. स्वाइन फ्लूचा वाढता प्रकोप लक्षात घेता, आरोग्य विभागाने अद्यापही कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. आरोग्य विभागाकडून जनजागृती आणि खबरदारी घेत जात नसल्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्या लक्षात घेता बसस्थानक, रेल्वे स्टेशन प्रवाशांची गर्दी होत आहेत; परंतु या ठिकाणीही कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.
‘स्वाइन फ्लूचा’ अकोल्यात पाचवा बळी
By admin | Published: April 20, 2017 1:14 AM