लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दूषित पाणी आणि बर्फामुळे मुंबईत अतिसाराचे प्रमाण वाढत आहे, त्यातच आता मुंबईत स्वाइन फ्लूचेही रुग्ण आढळले आहे. २०१७ मध्ये आतापर्यंत मुंबईत २१ रुग्ण आढळले असून, यातील दीड वर्षाच्या लहानग्याचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यूही झाला आहे. मुंबईतील वाढत्या साथीच्या आजारांविषयी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करावे, असेही सांगितले आहे.मुंबईमध्ये २०१६ मध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान ३ हजार ५०० अतिसाराचे रुग्ण आढळले होते. या वर्षी याच कालावधीत २ हजार ८५० अतिसाराचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईमध्ये ७४ टक्के बर्फाचे नमुने योग्य नसल्याचे चाचणीमधून उघड झाले आहे. हॉटेलमधील ०.४ टक्के तर फेरीवाल्यांकडील १० टक्के पाणी दूषित असल्याचे चाचणीमधून समोर आले आहे.वाढत्या तापमानामुळे थंडाव्यासाठी मुंबईकर बर्फाचा गोळा, ज्यूस आणि शीतपेयांकडे वळतात. यात बऱ्याच ठिकाणचे पाणी दूषित असते, त्यामुळे मुंबईतील अतिसाराचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. यामुळे घराबाहेर पाणी पिण्याचे टाळावे, जमल्यास घरातून पाण्याची बाटली सोबत न्यावी, असे आवाहन केसकर यांनी केले. या दूषित बर्फाबाबत एफडीएकडे पालिकेने तक्रार केली असून, एफडीएकडून त्यावर कारवाई केली जाईल, असे केसकर यांनी सांगितले.
मुंबईत आढळले स्वाइन फ्लूचे २१ रुग्ण
By admin | Published: May 09, 2017 1:49 AM