नागपूर - स्वाईन फ्लू नियंत्रणात येत नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे. सोमवारी पुन्हा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नागपूर विभागात मृतांचा आकडा ८४ वर पोहोचला आहे. तर रुग्णांची संख्या ४४१ झाली आहे. धक्कादायक म्हणजे, सध्याच्या घडीला शासकीयसह खासगी रुग्णालयात तब्बल ७६ रुग्ण उपचार घेत आहेत.सुजाता वराडे (४७) रा. कालमेघ ले-आऊट कळमेश्वर, रामचंद्र इंगळे (६२) रा. सौरभ कॉलनी अमरावती व निळकंठ कासारे (७०) रा. कडू ले-आऊट पंचवटी काटोल, असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निळकंठ कासारे यांचा मृत्यू धंतोली येथील एका खासगी इस्पितळात सोमवारी झाला. तर सुजाता वराडे व रामचंद्र इंगळे यांचा मृत्यू २९ सप्टेंबर रोजी एका खासगी इस्पितळात झाले. या मृत्यूला घेऊन नागपूर विभागात ८४ मृत्यूची नोंद झाली आहे. यात एकट्या नागपूर शहरातील ३६ मृत्यू आहेत. सोमवारी शहरातील सहा व ग्रामीण भागातील दोन, अकोला येथील एक व मध्य प्रदेशातील एक असे दहा रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. कळमेश्वर, काटोल या नागपूरच्या ग्रामीण भागात रुग्ण दिसून येऊ लागल्याने हा रोग पसरण्याची शक्यता डॉक्टर वर्तवित आहे. यामुळे सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका, असा सल्ला डॉक्टर देत आहे.
खासगीसह शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण
सध्याच्या स्थितीत नागपुरातील बहुसंख्य मोठे खासगी इस्पितळांमध्ये व मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार सध्याच्या स्थितीत मेयोमध्ये १४ तर मेडिकलमध्ये १५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १६ खासगी इस्पितळांमध्ये ४७ रुग्ण उपचार घेत आहेत.