लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्वाइन फ्लूने १५ जणांचा बळी जाऊनही आरोग्ययंत्रणा खडबडून जागी होत नसल्याने पालकमंत्र्यांनीच प्रत्येक पालिकेला प्रतिबंधात्मक लसींची खरेदी करण्याचे आदेश दिले खरे, पण आठवडा उलटल्यावरही एकाही पालिकेने अद्याप ही लस खरेदी न केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. पालिकांच्या आरोग्य यंत्रणा अशा हातावर हात ठेवून बसलेल्या असताना खाजगी रूग्णालयात मात्र घसघशीत किंमतीला या लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने रूग्णांच्या जिवाशी कसा खेळ सुरू आहे, त्याचे वास्तव उघड झाले.जिल्ह्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना शासनाकडे स्वाइन फ्लूच्या लसीचा तुटवडा असल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर, तातडीने ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच महापालिकांना स्वाइनची लस तातडीने खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याला आठ दिवस उलटल्यानंतरही अद्यापही एकाही महापालिकेने तिची खरेदी न करता पालकमंत्र्यांच्या आदेशाला ठाणे खाडीत बुडवले आहे. परंतु, ही लस लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी सर्वच महापालिकांकडून प्रयत्न सुरू असल्याची सारवासारव आरोग्य उपसंचालक विभागाने केली आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १५ झाली आहे.ठाणे जिल्ह्यात जानेवारीपासून १० जुलैपर्यंत स्वाइन फ्लूबाधित रुग्णांची संख्या ३५५ झाली आहे. यामध्ये अजूनही १३० रुग्ण जिल्ह्यातील विविध खाजगी आणि शासकीय रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर, स्वाइन फ्लूने दगावणाऱ्या रुग्णांचा आकडा आतापर्यंत १५ वर गेला आहे. यामध्ये सर्वाधिक ११ रुग्ण ठाणे पालिका हद्दीतील आहेत; तर उपचारासाठी दाखल असलेल्या १३० रुग्णांपैकी ठाणे पालिका हद्दीत ९२, कल्याण-डोंबिवली २२, नवी मुंबई १२ आणि मीरा-भार्इंदर ४ रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे, आतापर्यंत २१० स्वाइन फ्लूचे रुग्ण उपचार घेऊन घरी परतल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात स्वाइन फ्लू वाढल्याने गेल्या बुधवारी पालकमंत्री शिंदे यांनी आढावा बैठक घेतली होती. त्या वेळी शासनाकडे या फ्लूसंदर्भातील रोगप्रतिकार लस उपलब्ध नसल्याची माहिती पुढे येताच, त्यांनी जिल्ह्यातील सर्व महापालिकांना ती खरेदी करण्याबाबत निर्देश दिले होते. त्या निर्देशाला आठ दिवस उलटले, तरी अद्यापही जिल्हा प्रशासन तसेच एकाही महापालिकेच्या आरोग्य विभागात ही लस उपलब्ध झालेली नाही. >यंत्रणांचीचालढकल सुरूस्वाइनची त्या वर्षाची लक्षणे तपासून लसींमध्ये दरवर्षी आवश्यक सुधारणा केल्या जातात. सरकारला जी एजन्सी लस पुरवते, तिच्याकडून प्रतिबंधात्मक लस येण्यास विलंब लागत असेल तर तोवर पालिकांनी जेथून मिळेल तेथून लस खरेदी करावी, असे स्पष्ट सांगूनही आठवडाभरात काहीही घडलेले नाही. बाजारात लस उपलब्ध नाही, असे कारण सांगत पालिका चालढकल करत आहेत. जी लस पालिका रूग्णालयात दोनशे-अडीचशे रूपयांना मिळायला हवी ती खासजी रूग्णालयांत आठशे रूपयांना सहज उपलब्ध आहे. तिच एजन्सी त्यांनाही लस पुरवते आणि तो पुरवठा मात्र सुरळीत आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ‘‘अद्यापही लस खरेदी के ली नाही. त्यामुळे ठाणे पालिकेकडे लस उपलब्ध नाही. लस खरेदीसाठी महापालिकेत तरतूद आहे. मात्र, खाजगी एजन्सीकडे ती लस उपलब्ध नाही. पण, लवकरच लस खरेदी केली जाईल. ’’- आर.टी. केंद्रे, आरोग्य अधिकारी, ठामपा ‘‘जिल्हा आरोग्य विभागाबरोबर जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमध्ये स्वाइन फ्लूची अद्यापही लस उपलब्ध झालेली नाही. मात्र, महापालिका स्तरावर ती लस खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’- डॉ. एस.के. मेंढे, प्रभारी उपसंचालक, आरोग्य
स्वाइनच्या लसींचा धंदा
By admin | Published: July 13, 2017 3:44 AM