मुंबई : मार्च महिन्याच्या अखेरपासूनच मुंबईकर घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत. तापमान वाढल्याने स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येतही घट व्हायला लागली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून डोकं वर काढलेल्या स्वाइन फ्लूचे सध्या मुंबईत ५५ ते ६० रुग्णच उपचार घेत असून, तब्बल दीड हजारांहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईत १ हजार ५९८ रुग्ण आढळून आले होते. यापैकी १७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. फेब्रुवारीच्या मध्यात स्वाइनच्या रुग्णांची संख्या दर दिवशी ४०च्या आसपास होती. पण २८ मार्चपासून ही संख्या अर्ध्यावर आलेली आहे. गेल्या सात दिवसांत रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या सात दिवसांतील ५४ रुग्ण आणि आधीचे काही रुग्ण सध्या स्वाइन फ्लूचे उपचार घेत आहेत. उर्वरित स्वाइनचे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. गेल्या आठवडाभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णालयात काहीच रुग्णांना दाखल करण्यात आले आहे, त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. मुंबईबाहेरून आलेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे. (प्रतिनिधी)
तापमानवाढीमुळे स्वाइन ओसरतोय !
By admin | Published: April 04, 2015 4:41 AM