लोकमत न्यूज नेटवर्कवसई : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात पालघर जिल्हयातील मालवणी, वाडवळ आणि आगरी या मराठीच्या बोलीभाषांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात वसई आणि पालघरमधील साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी वसईतील ज्येष्ठ साहित्यिका प्राचार्य डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून बदलणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात पालघर, वसईतील बोलीभाषा असलेल्या वाडवळ आणि आगरी या मराठीच्या बोलींसह मालवणी बोलींचा समावेश करण्यात आला आहे. वाडवळी बोलीभाषेच्या अभ्यासक्रमात डॉ. सिसिलीया कार्व्हालो यांनी संपादीत केलेल्या वाडीतल्या वाटा पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकात केळवे येथील प्रसिध्द कवी आर.एम पाटील, रिचर्ड नुनीस (आॅस्ट्रेलिया) आणि डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या वाडवळी बोलीतील कविता आहेत. तसेच पुस्तकात वाडवळ समाजातील लोकगीतांचाही समावेश आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमात दीपक मच्याडो, स्मिता पाटील, स्टीफन परेरा, स्टॅन्ली घोन्सालवीस, आणि धोंडू पेडणेकर यांच्या वाडवळी कथांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त रेमंड मच्याडो यांची कोपात ही कादंबरी अभ्यासक्रमात लावण्यात आलेली आहे. सुनील आढावलिखित धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा हा ग्रंथ, डॉ. गंगाधर मोरजे यांचे मराठी ख्रिस्ती साहित्य विषयक लेखन व रा. ग. जाधव यांनी संपादीत केलेला मराठी वाड:मयाचा इतिहास खंड-८ हे ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासक्रमात लावण्यात आलेले आहेत. कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी गेल्यावर्षी तर्द्थ अभ्यास मंडळे स्थापलेली आहेत. त्यातील मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत डॉ. अरुणा ढेरे, डॉ. वृंदा भार्गवे, प्रा. नितीन आरेकर, डॉ. अलका मटकर यांची सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. २००९ साली महाराष्ट्र राज्यासाठी सांस्कृतिक धोरण तयार करण्याच्या समितीवर त्यांनी सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्या धोरणात बोलींना महत्वाचे स्थान देणे आणि त्यांचा अभ्यास होणे गरजेचे असल्यानेच अभ्यासक्रमात बोली आणलेल्या आहेत, असे डॉ. कार्व्हालो यांनी सांगितले.रक्तात भिनलेल्या कवितांचा समावेश : एम ए-२ च्या बदललेल्या आणि पर्याय पद्धतीच्या अभ्यासक्रमात विविध स्वरुपाचे साहित्य असून अल्पसंख्यांकांचे साहित्यम्हणून मराठी भाषक ख्रिस्ती समाज आणि मराठी भाषक मुस्लीम समाजातील लेखक-कवींचे साहित्य समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये वसईतील कवी जॉर्ज लोपीस यांच्या रक्तात भिनलेल्या कविता या कवितासंग्रहाचा समावेश आहे.
अभ्यासक्रमात वाडवळ, आगरी बोली
By admin | Published: June 08, 2017 3:20 AM