मुंबई : शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी आणि बैलगाडा शर्यतीवरी बंदी उठविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत सांगली येथील एका शेतकऱ्याने विचित्र आंदोलन छेडले आहे. सांगली येथील शेतकरी विजय जाधव सध्या या प्रतीकात्मक अंत्ययात्रेसोबत राज्यातील नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध नेत्यांच्या दारी ही अंत्ययात्रा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याची मागणी करत आहेत. याच मागणीसह विजय जाधव यांनी मंगळवारी ‘मातोश्री’वर घडक दिली. उद्धव ठाकरे बैठकीत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, ठाकरे यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले आहे. केवळ ‘मातोश्री’च नव्हे तर प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांच्या मुंबईतील निवासस्थानावर आपण ही अंत्ययात्रा काढणार असल्याचा निर्धार जाधव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे जाधव यांचे म्हणणे असून बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाबाहेर या प्रतीकात्मक अंत्ययात्रेची सांगता होणार आहे. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास त्याच ठिकाणी प्रतीकात्मक अंत्यसंस्कार करणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कर्जमाफीसाठी प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By admin | Published: April 05, 2017 2:18 AM