लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं तात्पुरते गोठविल्यानंतर ठाकरे गटाने पक्षासाठी तीन नावांचा आणि तीन चिन्हांचा प्राधान्यक्रमानुसार पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. यातील कोणते नाव आणि कोणते चिन्हं उद्धव ठाकरे गटाला मिळणार, याचा फैसला निवडणूक आयोग सोमवारी करणार आहे. उद्या, सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत याबाबत पर्याय देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटांना केली होती. ठाकरे गटाने पर्यायी नावे आणि चिन्हे सादर केली असली तरी शिंदे गटाने अद्याप ती सादर केलेली नाहीत. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीपूर्वी शिंदे गट पर्यायी चिन्हे आणि नावे सादर करण्याची शक्यता आहे.
‘वर्षा’वर घनघोर चर्चानव्या नावाबाबत आणि नव्या चिन्हाबाबत तीन पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे रात्री उशिरापर्यंत सादर केले नव्हते. निर्णय घेण्यासाठी शिंदे गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत खलबते झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत तलवार, गदा आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत चर्चा झाली. मात्र, निर्णय झाला नाही. निवडणूक आयोगाला कोणती तीन नावे आणि कोणती तीन चिन्हे सादर करायची, याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी शिंदे गट याबाबत पत्रक काढून आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
‘मातोश्री’वर खलबतेरविवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक पार पडली. यात नवे चिन्ह आणि नावाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार आम्ही प्राधान्यक्रमानुसार तीन चिन्हे आणि तीन नावांचा पर्याय सादर केला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम्हाला निवडणूक आयोगाकडून त्यापैकी एक चिन्ह आणि एक नाव मिळेल. ठाकरे गटाच्या या निर्णयानंतर ‘आमचं चिन्हं ठरलं’ अशा घोषणा मातोश्रीबाहेर जमलेल्या ठाकरे समर्थकांनी दिल्या.