लोकमत न्यूज नेटवर्ककळवण (जि. नाशिक) : माजी आदिवासी विकासमंत्री व कळवण मतदारसंघाची आठ वेळा आमदारकी भूषविलेले तसेच पाणीदार नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेले अर्जुन तुळशीराम तथा ए. टी. पवार (७९) यांचे बुधवारी सकाळी साडेसात वाजता निधन झाले. उद्या गुरूवारी सकाळी ११ वाजता दळवट या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, प्रवीण पवार या दोन मुलांसह मुली डॉ. विजया भुसावरे व गीता गोळे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. प्रकृती अस्वास्थामुळे पवार यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाशिक जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी पक्षबांधणीसाठी मोठे योगदान दिले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तसेच तापी विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पाणी व रस्ते या दोन प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिल्याने तालुक्यातील विविध सिंचन योजना मार्गी लागल्या. त्यामुळेच तालुक्यात पाणीदार नेता व ‘पाणदेव’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.
ए. टी. पवार यांचे मुंबईत निधन
By admin | Published: May 11, 2017 2:44 AM