ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. ६ : येथील इसबावी परिसरातील भीमा नदी पात्रातून छुप्या पध्दतीने वाळु उपसा व वाहतुक करणाऱ्या होड्या जाळताना महसुल विभागाचे तीन कर्मचारी भाजले आहेत. या भाजलेल्या कर्मचाऱ्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतला आहे.इसबावी कंडरे तालीम जवळील पाणीपुरवठा योजना परिसरातून अवैद्य वाळु उपसा सुरु असतो. वाळु उपसा करुन वाळु पोत्यामध्ये भरुन ती होडीद्वारे नदीच्याकडेला आणून विकली जाते. यामुळे तहसिलदार नागेश पाटील व मंडल अधिकारी बालाजी पुदलवार, मंडल अधिकारी चंद्रकांत ढवळे, तलाठी विजय जाधव, रणजित मोरे, बाळू मोरे, रवी शिंदे व एस. बी. कदम त्या होडींवर कारवाई करण्यासाठी गेले होते.यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेल्या या पथकाच्या हाती फक्त होड्याच आल्या, होडी चालक मात्र त्याठिकाणावरुन फरार झाले. यामुळे महसुल विभागाच्या या पथकाने त्याठिकाणी सापडलेल्या ६ होड्या जाळण्याचे व जे.सी.बी.च्या साहाय्याने तोडण्याचे ठरविले.यावेळी उपस्थित तलाठ्यानी त्या होड्यावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र या पथकातील तलाटी कदम यांच्या पायावर नकळत पेट्रोल पडले. ते होडी पेटवत असताना त्यांच्या पायावरील पेट्रोलने पेट घेतला. यामध्ये त्यांचे दोन्ही पाय भाजले. तसेच पंढरपूर मंडल अधिकारी बालाजी पुदलवार व तहसिलदारांच्या गाडीचे चालक घाडगे यांना थोड्याप्रमाणात भाजले आहे. यासर्वांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतला आहे. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार दिली नाही. यामुळे ही अर्धवट कारवाईवर नागरीकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंढरपुरात होडी जाळताना तलाठीही भाजले
By admin | Published: May 06, 2016 7:17 PM