दौंड : बेटवाडी येथील श्रीयोग माध्यमिक विद्यालयातील ६ वीचा विद्यार्थी ईश्वर पुरुषोत्तम क्षीरसागर याने स्वच्छतेचे महत्त्व ओळखून घराची फरशी स्वच्छ करण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक्स ब्रश’ हा वैज्ञानिक प्रयोग केला. दरम्यान, अल्प खर्चात साधारणत: ५०० रुपयांच्या जवळपास हा प्रयोग पूर्णत्वाकडे गेला आहे. दौंड तालुका विज्ञान प्रदर्शनात या प्रयोगाला दुसरा क्रमांक मिळून या प्रयोगाची जिल्हास्तरीय पातळीवर निवड झाली. ईश्वर क्षीरसागर या विद्यार्थ्याला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड आहे. त्यानुसार तिसरी-चौथीपासूनच त्याने छोटे-छोटे वैज्ञानिक प्रयोग करण्यास सुरुवात केली. परिणामी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छतेच्या उपक्रमाबाबतचे संदेश दूरदर्शन, वृत्तपत्र या माध्यमातून भावले. त्यानुसार त्याने स्वच्छतेसाठी इलेक्ट्रॉनिक्स ब्रश तयार करण्याचा मानस केला. त्यानुसार त्याने कपडे धुण्याचा ब्रश घेतला. या ब्रशवर पॉवर बँकची बॅटरी बसवून सोलर प्लेट लावून हे उपकरण तयार केले. सोलरवर या उपकरणाची बॅटरी चार्ज होत असल्याने कुठलाही विद्युतप्रवाह या उपक्रमाला लागत नाही. विद्युतप्रवाहाव्यतिरिक्त केवळ पॉवर बँकेवर १० ते १२ तास हे उपकरण चालते. घरातील फरशी स्वच्छ करण्यासाठी हे उपकरण सुरू करून सोडून दिले जाते. त्यामुळे संपूर्ण घरातील फरशी साफ केली जाते. या विद्यार्थ्याला शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद गायकवाड, शिक्षक जयंत हराळ यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले.
फरशी स्वच्छ करणारा इलेक्ट्रॉनिक ब्रश
By admin | Published: February 28, 2017 1:50 AM