मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपा खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी मुंबईतील स्वत:च्या मालकीचा फ्लॅट भाड्याने दिला असल्याची माहिती तब्बल १० वर्षे शासनापासून लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने ठोठावलेला दंड दोन वर्षांपासून त्यांनी भरलेला नसल्याचेही माहिती अधिकार कायद्यातून समोर आले.पोलीस दलात असताना अत्यंत जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना तसेच त्यानंतर खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. सिंह यांनी दंड भरण्याबाबत दोन वेळा पाठविलेल्या स्मरणपत्राकडेही दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे आजतागायत ४८ हजार ४२० रुपयांचा दंड प्रलंबित आहे. अंधेरीतील पाटलीपुत्र सोसायटीतील दहाव्या मजल्यावर त्यांचा आलिशान फ्लॅट आहे. डॉ. सिंग यांनी अडीच वर्षांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन त्यांनी उत्तर प्रदेशातील बागपत येथून लोकसभा निवडणूक जिंकली.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी अशाच संदर्भातील आजी-माजी शासकीय अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती. त्याबाबत गलगली यांना पाटलीपुत्र, साईप्रसाद, संगम आदी दहा गृहनिर्माण संस्थांतील काही कागदपत्रे देण्यात आली. त्यात सत्यपाल सिंह यांनी पाटलीपुत्र सहकारी गृहनिर्माण संस्थेतील त्यांची दहाव्या मजल्यावर सदनिका २००३ पासून भाड्याने दिली आहे. मात्र त्यांनी तब्बल दहा वर्षांनी म्हणजे २८ जानेवारी २०१३ रोजी मुंबईचे आयुक्त असताना त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला स्वत:च्या हाताने पत्र लिहून कळवून ५,३८० रुपयांचा धनादेश पाठविला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना १० वर्षांपासून नियमाचे उल्लंघन केल्याने एकूण ५३ हजार ८०० रुपये दंड आकारून उर्वरित ४८,४२० रुपये भरण्याची नोटीस पाठविली होती. त्याबाबत दोन वेळा स्मरणपत्रे पाठवूनही त्यांनी अद्यापही रक्कम भरलेली नाही. (प्रतिनिधी)
सत्यपाल सिंह यांनी थकवला दंड
By admin | Published: March 02, 2016 3:20 AM