नाशिक - दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटात वाद सुरू आहे. दसरा मेळावा आम्हीच घेणार असा दावा दोन्ही बाजूने करण्यात आला. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही गटांनी बीएमसीकडे परवानगी मागितली. परंतु बीएमसीने कायदा-सुव्यवस्थेचं कारण सांगत परवानगी नाकारली. त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून हायकोर्टात याचिका करण्यात आली. त्यात हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास ग्रीन सिग्नल दिला. त्यावरून आता शिंदे-ठाकरे गटात मेळाव्याच्या गर्दीवरून रणनीती आखण्यात येत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.
दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहरातून ३००-३५० बसेस भरून कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. त्याचसोबत मनमाड येथून २ रेल्वे बुक करण्यात आल्या आहेत अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. दरवर्षी शिवतीर्थावर गर्दी एकनाथ शिंदेंनी जमवली होती. आता तीच तयारी बीकेसी ग्राऊंडवर होणार आहे. नेहमीप्रमाणे तयारी सुरू आहे. हायकोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत याबाबत ज्येष्ठ वकिलांशी चर्चा सुरू आहे असं कांदेंनी सांगितले.
तसेच नेहमी शिवाजी पार्कवर गर्दी जमवण्याचं काम एकनाथ शिंदेंकडून व्हायचं. त्यामुळे आम्हाला बीकेसीत गर्दी जमवणं काही कठीण नाही. लोकांची गर्दी, शिवसैनिकांची गर्दी, बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोक एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी करतील. ही गर्दी ओसांडून वाहील असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंची टोमणे सभादसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला त्याची टॅगलाईन होती हिंदुत्ववादी विचारांचे सोनं लुटण्यासाठी या, आता ज्यांना परवानगी मिळाली त्याठिकाणी हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळणार नाहीत. तर टोमणे ऐकायला मिळतील. गद्दार, वज्रमूळ, खोके, बेईमानी हेच शब्द असतील. ही टोमणे सभा असेल आणि खरा हिंदुत्ववादी विचार ऐकायचा असेल तर जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची सभा होईल तिथे हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळतील असं सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
वाजत गाजत या, पण परंपरेला गालबोट लागेल असे वागू नका कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या बहिण, भावांनी आमच्या परंपरेला पुढे न्यायचे आहे म्हणून शिस्तीने वागावे. आमच्यावर कोणी बोट दाखविण्याची हिंमत करू नये. सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल. न्यायदेवतेवर मी संशय घेतलेला नाही. आज लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, असे ठाकरे म्हणाले.