अभिमन्यू कांबळे,
परभणी- जिल्हा परिषदेवर आतापर्यंत दबदबा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला काँग्रेसकडूनच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात असून, यासाठी पडद्यामागे कोठे शिवसेनेची तर कोठे अन्य पक्षांची मदत घेऊन राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्याचे डावपेच काँग्रेसच्या नेत्यांकडून खेळले जात आहेत. मावळत्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ तर काँग्रेसचे ८ सदस्य निवडून आले होते. दोन्ही पक्षांनी एकत्रित मिळून जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली असली तरी काँग्रेसमधील दोन गटांनी मजबुरीने राष्ट्रवादीला अधिक संख्याबळ असल्याने सहकार्य केले. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहिले. विधानसभा निवडणुकीपूर्वी माजीमंत्री सुरेश वरपूडकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पाथरी विधानसभेचे तिकीट राष्ट्रवादीकडून मिळाले नसल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा लढविली. विधानसभेत त्यांना अपयश मिळाले असले तरी प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपद देऊन त्यांचे पुनर्वसन केले. त्या वेळेसपासून मोठ्या जोमाने वरपूडकर पक्षवाढीच्या कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीमध्ये असताना त्या पक्षातही गटबाजी होती. त्या वेळी राष्ट्रवादीचे आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबत त्यांचे तीव्र मतभेद व मनभेद होते. विधानसभा निवडणुकीत आ. दुर्राणी यांनी वरपूडकर हे विजयी होऊ नयेत, यासाठी बरीच मेहनत घेतली. दुर्राणी - वरपूडकर यांच्या वादात अपक्ष उमेदवार मोहन फड विधानसभेला निवडून आले. विधानसभेत झालेल्या दगाफटक्याची सल अद्यापही वरपूडकर यांच्या मनात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभूत करायचेच, असा चंग त्यांनी बांधला आहे. त्या दृष्टीकोनातून त्यांनी तयारीही सुरू केली आहे. >पडद्यामागे तडजोडीचे राजकारणजिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा हे चारही पक्ष स्वतंत्र लढविणार हे जवळपास निश्चित झाले आहे. बऱ्याच जि.प. गटांत या पक्षांचे उमेदवार उभे राहणार असले तरी पडद्यामागे मात्र परभणीची खासीयत असलेले जुने तडजोडीचे राजकारण चालणार आहे. कारण पक्षीय विचारापेक्षा गटाचे राजकारण जिल्ह्यात प्रभावी राहते.