मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणले असून त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. याच पार्श्वभूभीवर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू असल्याचे म्हटले आहे. बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी राणाला भारतात आणले गेले आहे. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात, असेही ते म्हणाले. संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
तहव्वूर राणा प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू आहे. बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणि या मुद्द्याचा निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी वापर करतील. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात, असेही संजय राऊत म्हणाले.
सत्ताधारी पक्षाने श्रेय घेऊ नये- राऊतराणाला भारतात आणले गेले असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केले पाहिजे, त्यासाठी भाजपने श्रेय घ्यायचे कारण काय आहे? काँग्रेसच्या काळातच राणाला भारतात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे सत्ताधारी पक्षाने श्रेय घेऊ नये. राणाच्या आधी अबू सालेम यालाही अशाच प्रक्रियेतून भारतात आणण्यात आले होते, असा टोला संजय राऊतांनी अप्रत्यक्ष भाजपला लगावला. भाजपला जर राणाचे श्रेय घ्यायचे असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घेतले पाहिजे, भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनाही परत आणावे, असेही संजय राऊत म्हणाले.