परभणी, दि. 12 : तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि तलाठी सोपान सिरसाठ यांना धक्काबुकी व मारहाण करणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांनी १२ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे़. या आंदोलनात जिल्हाभरातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील महसूलचा कारभार ठप्प पडला आहे़.
अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़. राहुल गांधी यांच्या सभेच्या दिवशी कर्तव्यावर उपस्थित असलेले परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना सभामंडपात जाण्यास मज्जाव करण्यात आला़. तहसीलदार कडवकर यांनी स्वत:ची ओळख देवून ओळखपत्र दाखविल्यानंतरही अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी त्यांना धक्काबुक्की करून सभामंडपात प्रवेश दिला नाही़. तालुकास्तरीय दंडाधिका-यांना दिलेली ही वागणूक निषेधार्ह असून, या विरुद्ध तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनांबरोबरच महसूल कर्मचारी संघटनांनीही आंदोलनाची भूमिका घेतली़.
या घटनेच्या दुस-याच दिवशी गंगाखेड येथे तलाठी शिवाजी मुरकुटे यांना पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांनी मारहाण केली़. या दोन्ही घटनांमुळे महसूलच्या अधिकारी, कर्मचा-यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, दोषी पोलीस अधिका-यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारपासून जिल्ह्यात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे़. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन करण्यात येईल. तसेच राज्य पातळीवरसुद्धा आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी कर्मचा-यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाटपरभणी व गंगाखेड येथील घटने प्रकरणी जिल्ह्यातील संपूर्ण महसूल विभाग आंदोलनात उतरला आहे़. त्यात १० उपजिल्हाधिकारी, १२ तहसीलदार, ४७ नायब तहसीलदार, ९९ अव्वल कारकून,१५८ लिपिक, २३७ तलाठी, ४० मंडळ अधिकारी, ११८ शिपाई, २३९ कोतवाल, १८ चालक आणि ५ स्टेनो आदी अधिकारी, कर्मचा-यांचा समावेश आहे़. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला होता.